अभिनेता डिनो मोरियाची संपत्ती जप्त, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीची कारवाई
मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई, अभिनेता डिनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांची संपत्ती जप्त केली आहे.
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) अर्थात ईडीने शुक्रवारी (2 जुलै) काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई, अभिनेता डिनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांची संपत्ती जप्त केली आहे. बँक घोटाळा आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.
पीएमएलए कायद्याअंतर्गत या चार जणांची संपत्ती जप्त करण्याचे सुरुवातीचे आदेश दिल्याचं ईडीने सांगितलं. संपत्तीची एकूण किंमत 8.79 कोटी रुपये असल्याचं ईडीने आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. यात आठ मालमत्ता, तीन वाहनं आणि इतर बँक अकाऊंट्स, शेअर्स/म्युचल फंड यांचा समावेश आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेने म्हटलं आहे की, जप्त केलेल्या संपत्तीपैकी तीन कोटी रुपयांची मालमत्ता संजय खान यांची आहे. डिनो मोरियाची संपत्ती 1.4 कोटी रुपये आहे आणि डिजे अकील नावाने लोकप्रिय असलेल्या अकील अब्दुलखलील बचूअलीची संपत्ती 1.98 कोटी रुपये आहे. तर अहमद पटेल यांचे जावई इरफान अहमद सिद्दिकी यांची संपत्ती 2.41 कोटी रुपयांची आहे.
ईडीने म्हटलं आहे की, "स्टर्लिंग बायोटेक समूहाचे फरार प्रवर्तक नितीन संदेसरा आणि चेतन संदेसरा यांनी आपल्या गुन्ह्यातून जे धन मिळवलं ते या चार जणांना दिलं.
प्रवर्तक बंधु नितीन संदेसरा, चेतन संदेसरा, चेतनची पत्नी दिप्ती संदेसरा आणि हितेश पटेल यांना एका विशेष कोर्टाने फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केलं आहे.
पैशांच्या अफरातफरीचं हे प्रकरण 14 हजार 500 कोटी रुपयांच्या कथित बँक घोटाळ्याशी संबंधित आहे. स्टर्लिंग बायोटेक आणि कंपनीच्या मुख्य प्रवर्तक आणि संचालकांनी हा कट रचला होता.
यामी गौतमला समन्स
अभिनेत्री यामी गौतमलाही ईडीने समन्स बजावला आहे. फेमा कायद्याअंतर्गत कथित अनियमितता आढळल्याच्या संदर्भात आपला जबाब नोंदवण्यासाठी तिला पुढील आठवड्यात हजर राहण्यास सांगितलं आहे.