"मनसे तर टाईमपास टोळी, त्यांना गांभीर्यानं का घ्यायचं?" ; शिवसैनिकांवरील खंडणी वसुलीच्या आरोपांवरुन आदित्य ठाकरेंचा पलटवार
फेरीवाल्यांकडून दररोज 10 रुपये गोळा केले जात असून ही रक्कम भरल्यास पालिका कारवाई करणार नसल्याचं शिवसैनिकांकडून फेरीवाल्यांना सांगितलं जात आहे. याप्रकरणी मनसेनं केलेल्या आरोपांवर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : विक्रोळी खंडणी वसुलीप्रकरणी शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आता मनसेवप पलटवार केला आहे. मनसे ही टाईमपास टोळी आहे, त्यांना गांभीर्यानं का घ्यायचं?, असं आदित्य ठाकरे म्हणत आहेत. मुंबईत फेरिवाल्यांकडून शिवसेना कार्यकर्त्यांना अनधिकृत वसुली सुरु केल्याचा आरोप स्थानिक फेरीवाल्यांनी केला आहे. इतकचं नाही पण या फेरीवाल्यांना या वसुलीची पावतीदेखील शिवसैनिकांनी दिली असल्याची माहिती मिळत आहे.
फेरीवाल्यांकडून दररोज 10 रुपये गोळा केले जात असून ही रक्कम भरल्यास पालिका कारवाई करणार नसल्याचं शिवसैनिकांकडून फेरीवाल्यांना सांगितलं जात आहे. याप्रकरणी मनसेनं केलेल्या आरोपांवर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, "पक्ष आहे की, संघटना की काय, टाईमपास टोळी असेल. पण यांच्याकडे स्वतःचे कार्यकर्ते देखील नाहीत. पण यांच्याकडे स्वतःचे कार्यकर्तेही लक्ष देत नाहीत. त्यामुळे मला वाटतं की, यांच्याकडे लक्ष देणं गरजेचंही नाहीये."
पाहा व्हिडीओ : "मनसे तर टाईमपास टोळी,त्यांना गांभीर्याने का घ्यायचं!" विक्रोळी खंडणी प्रकरणी आदित्य ठाकरेंचा पलटवार
काय होता मनसेचा आरोप?
मनसे नेते संदीप देशपांडे शिवसेनेवर निशाणा साधत म्हणाले होते की, "साधारणपणे तीन ते चार दिवसांपूर्वी मी ट्वीट केलं होतं. त्यामध्ये मी असं म्हटलं होतं की, वीरप्पनने देशाला जेवढं लुटलं नसेल, त्याहून जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. त्यामुळे वीरप्पन गँगचा एन्काउंटर करावा लागेल. त्यावेळी हे वक्तव्य शिवसेनेतील बऱ्याच लोकांना झोंबलं. पण या पूर्ण मुंबईत खंडणी मागणाऱ्यांची वीरप्पन टोळी ही सक्रिय झालेली आहे. आणि शिवसेनेच्या आशीर्वादाने सक्रीय झालेली आहे."
शिवसेना आणि मनसे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांवर भाजपनेही निशाणा साधला आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मनसेचे आरोप मला माहिती नाहीत. पण खंडणीखोरीचे आरोप शिवसेनेवर नेहमीच लावले जातात." तर भाजप नेते आशिष शेलार बोलताना म्हणाले की, "शिवसेनेचा प्रवास हा ज्या पद्धतीने चाललाय, ते पाहता खऱ्या अर्थाने जगात कोणत्याही व्यक्तीला आश्चर्य वाटेल अशा प्रकारचं वर्तन आहे. राम वर्गणीला विरोध करायचा आणि पदपथावरील गरीब माणसांच्या पाठीत खंजीर खुपसून हफ्ता वसुली करायची. राम वर्गणीला टीका करायची आणि रस्त्यावर पोट भरणाऱ्या मुंबईकराच्या तोंडचा घास हफ्ता वसुली करुन काढून घ्यायचा. यापद्धतीचा मुंबईकरांवरचा कर्दनकाळ ठाकरे सरकार असताना येतोय. याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे."