(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वर्धापनदिनी मनसेकडून पेट्रोल-डिझेलवर 15 रुपयांची सूट, मुंबईच्या वडाळ्यात मनसेचा अनोखा उपक्रम
वर्धापनदिनाच्या निमित्ताने मनसेकडून पेट्रोल-डिझेलमध्ये 15 रुपये प्रतिलिटर सूट देण्यात आली आहे. मुंबईच्या वडाळा भागातील 9 पेट्रोल पंपांवर मनसेनं अनोखा उपक्रम राबवला आहे. गगनाला भिडलेल्या इंधन दरवाढीमुळे त्रस्त नागरिकांना मनसेच्या उपक्रमामुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
मुंबई : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पंधरावा वर्धापन दिन आहे. मात्र, यावर्षी राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यावर्षीचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने कोणताही मोठा कार्यक्रम मनसेच्यावतीने आयोजित करण्यात आलेला नाही. त्यामुळे आजच्या वर्धापनदिनी वडाळ्यातील मनसे कार्यकर्त्यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना एका वेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करायचे ठरवले आहे. यासाठी मनसेने एक उपक्रम हाती घेतला यामध्ये दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होत असताना कुठलाही दिलासा सर्वसामान्य लोकांना ना राज्य सरकारकडून मिळतोय ना केंद्र सरकारकडून. काल राज्याच्या अर्थसंकल्पातही पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतींवर राज्य सरकारकडून कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. अशातच मनसेनं आजच्या वर्धापन दिनी वडाळ्यातील नऊ पेट्रोल पंपावर प्रति लिटर 15 रुपयांची सूट देत सर्वसामान्यांना एक प्रकारचा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या भाव वाढीविरोधात सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.
पेट्रोल-डिझेलच्या भाव वाढीची झळ सर्वसामान्यांना जाणवत असताना ज्या लोकप्रतिनिधींना जनतेने निवडून दिले तेच जनतेचा प्रश्न सोडवत नसल्याचे दिसत आहे. त्यात आज या उपक्रमासाठी वडाळा विधानसभा विभाग अध्यक्ष आनंद प्रभू यांनी आजच्या दिवशी पेट्रोल डिझेलमध्ये सर्वसामान्य सूट मिळावी. यासाठी कूपन तयार करून लोकांना वाटप केले. आज 9 मार्चला सकाळी 9 ते रात्री 9 च्या दरम्यान वडाळ्यातील 9 पेट्रोल पंपांवर 5000 सर्वसामान्यांना कूपन घेऊन ही सूट पेट्रोल-डिझेलच्या दरात मिळावी यासाठी प्रयत्न केला जात आहे.
सर्वसामान्य मुंबईकरांनीसुद्धा या उपक्रमाला साथ देत आजच्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या पेट्रोल पंपावर जाऊन सूट घेतली. पेट्रोल पंपवर मनसे कार्यकर्त्यांनी येणाऱ्या सर्वसामान्यांना रविवार पासून कूपन वाटप करत होते. शिवाय, आज सुद्धा कूपन वाटप केले गेले. या उपक्रमात सहभागी होऊन मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात अशाप्रकारे या उपक्रमाचा आधार घेत विरोध करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचं अभिनंदन तर केलंच, तसेच आजच्या वर्धापन दिनी शुभेच्छाही दिल्या.
सलग नवव्या दिवशी पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर
गेल्या काही दिवसात सातत्याने वाढत चाललेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सलग नवव्या दिवशी स्थिर आहेत. त्यामध्ये कोणतीही भाव वाढ न झाल्याने सामान्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 97.57 इतकी आहे तर डिझेलची किंमत ही 88.60 इतकी आहे. दिल्लीमध्ये हाच दर अनुक्रमे 31.17 आणि 81.47 रुपये इतकी आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Petrol and Diesel price | सलग नवव्या दिवशी पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर
- Maharashtra Budget 2021 : मद्यप्रेमींना झटका, दारु महागणार? मद्यावरील व्हॅट वाढवला
- Maha Budget 2021 | अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलबाबत घोषणा नाही; इंधन दरवाढीमुळे त्रस्त नागरिकांची निराशा