Saraswati Murder Case: मीरा रोडच्या सरस्वती वैद्य हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे; पोलीस तपासात कोणती माहिती समोर?
Mira Road Crime: सरस्वती वैद्या हत्या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत, या दरम्यान रोज नवीन माहिती समोर येत आहे.
![Saraswati Murder Case: मीरा रोडच्या सरस्वती वैद्य हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे; पोलीस तपासात कोणती माहिती समोर? mira road news saraswati vaidyas body pieces were reportedly thrown into a nearby drain by accused Saraswati Murder Case: मीरा रोडच्या सरस्वती वैद्य हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे; पोलीस तपासात कोणती माहिती समोर?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/12/cbf74779205643514d7cc11e86c848e61686577016273713_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mira Road Crime: मीरा रोडच्या सरस्वती वैद्य हत्याकांडात (Saraswati Vaidya Murder Case) आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आरोपी मनोज साने (Manoj Sane) यानं मयत सरस्वती वैद्य (Saraswati Vaidya) हिची हत्या करुन तिचे तुकडे जवळच्या नाल्यात फेकल्याची माहिती आता समोर येत आहे. साने हा सरस्वतीच्या शरीराचे तुकडे करुन ते कुकरमध्ये उकडवत होता. त्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने काही तुकडे जवळच्या नया नगरच्या बॅकरोड येथील रेल्वेच्या समांतर नाल्यात फेकल्याचं समोर आलं आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास नया नगर पोलीस आरोपीला घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते आणि आरोपीला विचारुन तुकडे कुठे टाकले त्याची जागा निश्चित करत होते.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात प्रकार कैद
आरोपी मनोज साने राहत असलेल्या इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो सरस्वतीच्या शरीराचे अवयव एका पिशवीत घेऊन जाताना दिसत आहे. त्याचबरोबर आरोपी मनोज साने हा मृत सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे टाकताना अत्यंत सावधगिरी बाळगत असल्याचंही सीसीटीव्हीतून समोर आलं आहे. इमारतीची लिफ्ट सातव्या मजल्यावर थांबल्यावरच तो मृतदेहाच्या तुकड्यांनी भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन घराबाहेर पडत असल्याचं दिसून येत आहे.
आरोपीच्या घरातून काही औषधं देखील मिळाली
पोलिसांना आरोपीच्या घरातून काही औषधं देखील मिळाली आहेत, त्याचा तपास आता नया नगर पोलीस करणार आहेत. मयत सरस्वती वैद्य यांच्या तीन बहिणी काही नातेवाईकांसह सकाळी नया नगर पोलीस ठाण्यात आल्या होत्या. मृत सरस्वती वैद्यची बहीण आपल्या बहिणीचा मृतदेह घेण्यासाठी जे.जे. हॉस्पिटलला निघाली होती. सोमवारी (12 जून) नया नगर पोलीस बहिणी आणि मृत सरस्वती वैद्य यांची डीएनए चाचणी करणार होते. त्यानंतर, सरस्वती वैद्य यांचे पार्थिव डीएनए चाचणीनंतर बहिणींच्या ताब्यात दिले जाणार होते.
दोघांचा विवाह झाल्याचं समोर
आरोपी मनोज साने याने वसईतील तुंगारेश्वर मंदिरात मयत सरस्वती वैद्यशी विवाह केल्याची माहिती देखील आता समोर आली आहे. तर, मयत सरस्वतीच्या लहान बहिणीने 1998 मध्ये लग्नाच्या दोन वर्षांनंतर आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
पोलीस घेणार पत्रकार परिषद
या सर्व घटनेबाबात नया नगर पोलीस कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार देत आहेत. मात्र, मंगळवारी (13 जून) पोलीस पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंतच्या हत्याकांडातील तपासाची माहिती देणार असल्याचं समजत आहे.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)