...तर आज बैठक घेण्याची वेळ आली नसती- रामदास कदम
मराठा समाजाच्या मागण्याकडे वेळीत लक्ष देण्याबाबत रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून काही दिवसांपूर्वीच सुचवले होते.
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन तातडीनं लक्ष घालण्याची विनंती केली होती, असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी वेळीच लक्ष दिलं असतं तर आज बैठक घेण्याची वेळ आली नसती, असंही कदम म्हणाले.
शिवाय पत्राची दखल मुख्यमंत्र्यांनी का घेतली नाही? असाही सवाल रामदास कदमांनी विचारला आहे. मराठा समाजाच्या आरक्षण मिळण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाबाबत रामदास कदम यांनी 20 जुलैला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं.
"मराठा समाजाच्या आंदोलनांची दखल न घेतल्याची खंत" मराठा समाजाने विविध मागण्यांसाठी आजवर 57 मुकमोर्चे काढले. मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने काढलेल्या या मोर्चात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेही उद्भवला नाही. या ऐतिहासिक मोर्चांच्या माध्यामातून कोणताही ठोस निर्णय आला नसल्याची खंत कदमांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली.
"विशेष आधिवेशन बोलवावं" आवश्यकता भासल्यास मुंबईत विशेष अधिवेशन बोलावून सभागृहात चर्चा करून एकमताने ठराव मंजूर करावा. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी असून त्यासाठी कोणत्याही समाजाचा विरोध नाही, असंही रामदास कदमांनी आपल्या पत्रात नमूद केलं होतं.
"मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरती थांबवावी" शासनाकडून घेण्यात येणारी मेगा भरती मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत थांबवावी. तसं न केल्यास मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर अन्याय होईल. मराठा समाजाचा सहानुभुतीने विचार करुन मराठा तरुणांना मेगाभरतीत संधी मिळावी, अशी विनंती रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या पत्रातून केली होती.