आरे कारशेडला तज्ज्ञांनी पर्यायी जागा सुचवावी, सरकार त्यावर नक्की विचार करेल : आदित्य ठाकरे
आरे कारशेडबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठं मत मांडलं आहे. कारशेडला तज्ज्ञांनी पर्यायी जागा सुचवावी. सरकार त्यावर नक्की विचार करेल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुंबई : मुंबई मेट्रो-3 साठीचं आरे कॉलनीमध्ये असलेले नियोजित कारशेड पर्यायी जागी हलवावं, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे. या मागणीचा विचार करत पर्यावरण मंत्री आदित्यू ठाकरे यांनी आरे कारशेड इतरत्र हलवण्यास सहमती दर्शवली आहे, मात्र तज्ञ्जांनी पर्यायी जागा सुचवावी असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
आदित्य ठाकरे फोरम ऑफ एन्वायरमेन्टल जर्नलिस्ट्स इन इंडियाचे सहसचिव अतुल देऊळगावकर यांनी सादर केलेल्या निवेदनावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. आरे कारशेडला तज्ज्ञांनी पर्यायी जागा सूचवावी. सरकार त्यावर नक्की विचार करेल. सरकारची तशी तयारी आहे. याशिवाय, राज्यभरात येत्या वर्षभरात इलेक्ट्रीक बसेस संख्या वाढवण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचं, आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
आरेचं संरक्षण करण्यासाठी पर्यावरण मंत्री नात्याने आदित्य ठाकरे यांनी तातडीने पावलं उचलावी. याशिवाय मोठे प्रकल्प सुरु असताना त्याठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्ट सेवा आणि बस लेन यांची व्यवस्था करावी, जेणेकरुन खासगी वाहनांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल. सध्याची पाणीटंचाईची समस्या, वायू प्रदूषण याकडे लक्ष देण्याचं आवाहनं अतुल देऊळगावकर यांनी केलं.
मेट्रो कारशेड समितीचा अहवाल सादर, आरेमध्येच काम सुरु ठेवण्याची शिफारस
मेट्रो 3 चं कारशेड इतरत्र हलवणं व्यवहार्य नाही : मेट्रो कारशेड समिती
याआधी, मुंबईतील मेट्रो 3 चं कारशेड इतर ठिकाणी हलवणं व्यवहार्य नाही. त्यामुळे आरे कॉलनीमध्येच कारशेडचं काम सुरु करावं, अशी शिफारस चार सदस्यीय मेट्रो कारशेड समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. अतिरिक्त मुख्य सचिव (अर्थ) मनोज सौनिक यांनी समितीचा अहवाल मंगळवारी (28 जानेवारी) मुख्यमंत्री कार्यालयाकडे सोपवला. 33.5 किमीचा कुलाबा-वांद्रे-सीप्झ अंडरग्राऊंड मेट्रो प्रकल्पाचं कारशेड इतरत्र हलवणं व्यवहार्य नाही. समितीला कारशेडसाठी पर्यायी जागा सापडलेली नाही.
आरे सोडून कांजूरमार्ग किंवा इतर ठिकाणी कारशेड हलवल्यास सरकारी तिजोरीवर हजारो कोटींचा भार पडणार असल्याचं समितीचं म्हणणं आहे. त्यामुळे अडथळे, वाढणारा खर्च आणि प्रकल्पाला होणारा उशीर टाळण्यासाठी कारशेड आरेमध्येच व्हावं, अशी शिफारस समितीने केली आहे.
मेट्रो कारशेडसाठी ऑक्टोबर 2019 मध्ये आरेमधील झाडांची रात्रीत कत्तल करण्यात आली. यावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. पर्यावरणप्रेमींसह शिवसेनेनेही या निर्णयाचा जोरदार विरोध केला होता. यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला पहिला निर्णय म्हणजे आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती. मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर 2019 मध्ये मेट्रो कारशेडला पर्यायी जागा शोधण्यासाठी समिती नेमण्यात आली होती.
संबंधित बातम्या