100 एकरात सभा...सात कोटींचा निधी कुठून आला? भुजबळांचा जरांगेच्या सभेवर सवाल, ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यास विरोध
Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. पण, त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देता कामा नये असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
मुंबई : ओबीसींमधील कुणबी समाजाचे (Kunbi Caste) जात प्रमाणपत्र देऊन मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) द्यावे अशी मागणी करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या सभेसाठी, कार्यक्रमासाठी निधी कुठून येतो, असा सवाल राज्याचे मंत्री आणि समता परिषदेचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे. 100 एकरात शेती साफ करून मैदान तयार केले जात आहे. त्यासाठी 7 कोटी रुपयेदेखील जमा केले आहेत. एवढे पैसे येतात कुठून असा सवाल भुजबळ यांनी केला आहे.
समता परिषदेची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंत्री छगन भुजबळांच्या निशाण्यावर मनोज जरांगे पाटील होते. भुजबळ यांनी म्हटले की, 100 एकरात शेती साफ करुन मैदान करताय, 7 कोटी रुपये जमा देखील केले आहेत. एवढे पैसे येतात कुठून? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.
जालनातील अंतरावली गावात मराठा आरक्षणासाठीची सभा पार पडणार आहे. या सभेत मनोज जरांगे संबोधित करणार आहे. जालनातील उपोषण आंदोलनात सरकारने दिलेल्या आश्वासनाच्या पूर्तेतसाठी जरांगे आग्रही आहेत.
जालनातील अंतरावलीत होणाऱ्या या सभेतून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागणार आहेत. हे कदापी मान्य नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. आपला मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध नाही. मात्र, ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
आपण 54 टक्के आहोत म्हणजेच 7 कोटी ओबीसी समाज आहोत. आपणही मोठे कार्यक्रम करायला हवेत असेही भुजबळ यांनी उपरोधिकपणे म्हटले. ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले म्हणजे ओबीसी श्रीमंत झाला असं नाही अजुनही झोपडपट्टीत ओबीसी समाज राहत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मराठा समाजातील सरसकट लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केले. यातून मार्ग काढण्यासाठी महिनाभरात सरकारकडूनही जोरदार प्रयत्न केले जात आहेत. मात्र, यास राज्यातील ओबीसी समाजाच्या वतीने आक्षेप घेण्यात आल आहे. ओबीसी आरक्षणात कुणालाही वाटेकरी करू नका, या मागणीसाठी राज्यभर आंदोलने झाली. यातूनच मनोज जरांगेंनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. मराठा आणि कुणबी पूर्वीपासून एकच आहेत. तशी कागदपत्रे असल्याचा दावा करत भुजबळ मराठा आरक्षणात मिठाचा खडा टाकू नये अशी टीका मनोज जरांगे यांनी केली होती.