Maratha Reservation in Mumbai: खाऊगल्ली बंद असल्याने मराठा आंदोलक आमदार निवासात, जेवण मिळालं नाही, मग जोरदार राडा घातला
Maratha Reservation in Mumbai: दक्षिण मुंबईत सध्या खाऊगल्ली बंद असल्यामुळे मंत्रालयाजवळ असलेल्या आकाशवाणी आमदार निवासच्या कँटीनमध्ये आंदोलकांनी गर्दी केली होती.

Maratha Reservation in Mumbai: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली सध्या मुंबईच्या आझाद मैदानात मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. शुक्रवारी मराठा आंदोलक (Maratha Reservation) मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी आझाद मैदानात ठिय्या मांडला आहे. मराठा आंदोलक काल रात्रभर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकातील फलाटांवर झोपले होते. मात्र, आज सकाळी आझाद मैदानाच्या परिसरात असलेल्या अनेक शौचालयांमध्ये पाणी नव्हते. तसेच मुंबई महानगरपालिकेने या परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी मराठा आंदोलकांचे खाण्याचे प्रचंड हाल झाल्याचे दिसून आले आहे. यानंतर मराठा आंदोलकांनी आमदार निवास गाठले. मात्र तेथेही त्यांना जेवण न मिळाल्याने मराठा आंदोलकांनी आमदार निवास परिसरात जोरदार राडा घातल्याचे पाहायला मिळाले.
नेमकं काय घडलं?
दक्षिण मुंबईत सध्या खाऊ गल्ली बंद असल्यामुळे मंत्रालयाजवळ असलेल्या आकाशवाणी आमदार निवासच्या कँटीनमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी जेवायला गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. अचानक वाढलेल्या या गर्दीमुळे काही काळासाठी आकाशवाणी आमदार निवासची कँटीन बंद करण्यात आले होते. यानंतर आंदोलकानी आमदार निवास परिसरात मोठा गोंधळ केला. आंदोलकांचा गोंधळानंतर टप्प्याटप्प्याने कँटीनमध्ये जेवायला सोडायला सुरुवात करण्यात आली आहे.
मनोज जरांगेंची सरकारवर टीका
दरम्यान, खाऊगल्ली बंद असल्याची मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आम्ही आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. पण या ठिकाणची खाऊ गल्ली, हॉटेल बंद करण्यात आले आहेत. पाण्याची सोय करण्यात आली नाही. आंदोलकांना चहा-पाणी, जेवण मिळू नये म्हणून हे सगळे करण्यात आले. त्यांना स्वच्छतागृहे मिळू नयेत यासाठी प्रयत्न केले. आम्ही सरकारशी सहकार्य केलं, त्यांच्या नियमांचे पालन केले. पण हे सरकार इंग्रजांपेक्षा बेकार आहे. सरकारने आडमुठेपणा केला तर आम्हीही आडमुठेपणा करणार, असे त्यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे,
2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा...सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.
3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.
4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.
आणखी वाचा
























