Maratha Reservation agitation Azad Maidan: आझाद मैदानाच्या परिसरातील हॉटेल्स, खाऊगल्ली दुसऱ्या दिवशीही बंद, मराठा आंदोलकांचे खाण्याचे प्रचंड हाल
Maratha Reservation: शौचालयात पाणी नसल्याने मराठा आंदोलकांनी बिसलरीचं पाणी वापरलं, मराठा आंदोलक सीएसएमटी स्थानकाच्या परिसरात रस्त्यावर उतरले आहेत. मराठा आंदोलक संतापले

Maratha Reservation agitation Azad Maidan: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली सध्या मुंबईच्या आझाद मैदानात मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. शुक्रवारी मराठा आंदोलक (Maratha Reservation) मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी आझाद मैदानात ठिय्या मांडला होता. मात्र, मुंबईत कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे मराठा आंदोलकांना याठिकाणी राहणे असह्य झाले आहे. आझाद मैदानात पावसामुळे प्रचंड चिखल झाल्याने मराठा आंदोलक काल रात्रभर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकातील फलाटांवर झोपले होते. आज सकाळी जागे झाल्यानंतर हे मराठा आंदोलक आझाद मैदानात (Azad Maidan) जाण्यासाठी तयारी करत आहेत. मात्र, आझाद मैदानाच्या परिसरात असलेल्या अनेक शौचालयांमध्ये पाण्याचा पत्ता नसल्याने मराठा आंदोलकांची प्रचंड गैरसोय होत आहे. या आंदोलकांना पॅकबंद पाण्याच्या बॉटल्स घेऊन शौचालयात जावे लागत आहे.
मराठा आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही मुंबई महानगरपालिकेने या परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी मराठा आंदोलकांचे खाण्याचे प्रचंड हाल झाले. रात्रभर सीएसएमटी स्थानकात मुक्काम केल्यानंतर मराठा बांधवांनी आझाद मैदानाकडे कूच केले. मात्र, आज सकाळीही या परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता मराठा आंदोलकांनीच आपल्या बांधवांसाठी नाश्त्याची सोय केली आहे. परभणीतील एका मराठा बांधवाने याठिकाणी नाश्त्याचा एक टेम्पो आणला आहे. याठिकाणी मराठा बांधवांना चहा, केळी आणि पोहे दिले जात आहेत. हे आंदोलन संपेपर्यंत आम्ही रोज याठिकाणी नाश्ता आणू, असे या मराठा आंदोलकाने सांगितले. दरम्यान, या परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवण्याच्या निर्णयावर मराठा आंदोलकांकडून प्रचंड टीका केली जात आहे.
मराठा आंदोलकांनी या सगळ्याबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला. आम्हाला वाटलं होतं, मुंबई ही बाळासाहेब ठाकरेंची आहे. पण इकडे आल्यावर कळलं की, मुंबई मराठ्यांची राहिलेली नाही. सरकार पण मराठ्यांसाठी काहीच करत नाही. निवडणुकीला सरकारला मराठा समाजाची मतं लागतात. पण आता आमच्याकडे लक्ष दिले जात नाही, अशी खंत मराठा आंदोलकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या सगळ्यानंतर मराठा आंदोलक आज सकाळी सीएसएमटी परिसरात रस्त्यावर उतरले. त्यांनी घोषणाबाजी केली. मराठा आंदोलक रस्त्यावर उतरल्याने सीएसएमटी परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
आणखी वाचा
मुंबईतील पावसामुळे आझाद मैदानात चिखल, शौचालयात पाणी संपलं, बिसलरीच्या बॉटल आणून...
Maratha Reservatio LIVE: मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा दुसरा दिवस, आझाद मैदानात धो-धो पाऊस

























