Mansukh Hiren | क्राईम ब्रान्चच्या तावडे नावाच्या व्यक्तीचा कॉल आला, मनसुख हिरेन गेले पण परत आलेच नाहीत, पत्नीची माहिती
पोलिसांना भेटायला जातो असं सांगून ते गेले, पण परतलेच नाही. मनसुख हिरेन कधीच आत्महत्या करु शकत नाही. त्यांच्या मृत्यू मागचं सत्य समोर यायला हवं, अशी प्रतिक्रिया मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिली आहे.
![Mansukh Hiren | क्राईम ब्रान्चच्या तावडे नावाच्या व्यक्तीचा कॉल आला, मनसुख हिरेन गेले पण परत आलेच नाहीत, पत्नीची माहिती Mansukh Hiren cannot commit suicide, should be thoroughly investigated, reacts wife Vimala Hiren Mansukh Hiren | क्राईम ब्रान्चच्या तावडे नावाच्या व्यक्तीचा कॉल आला, मनसुख हिरेन गेले पण परत आलेच नाहीत, पत्नीची माहिती](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/03/06030628/Vimla-Hiren.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे : कांदिवलीहून क्राईम ब्रान्चच्या तावडे नावाच्या व्यक्तीचा कॉल आला होता. मनसुख हिरेन गेले पण परत आलेच नाहीत. ते आत्महत्या करु शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमना हिरेन यांनी दिली. सोबतच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावं, असंही त्या म्हणाला. विमला हिरेन यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान ही प्रतिक्रिया दिली.
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. मुंब्र्यातील रेतीबंदर खाडीमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. मृतदेह बाहेर काढला त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर अनेक रुमाल होते. मनसुख हिरेन हे पट्टीचे पोहणारे होते. त्यामुळे खाडीत त्यांचा मृतदेह आढळल्याने मृत्यूचं गूढ वाढलं आहे.
याविषयी बोलताना विमला हिरेन म्हणाल्या की, "आमची गाडी आठ दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. पोलिसांच्या सूचनेनुसार ते वेळोवेळी चौकशीसाठी जात होते. दिवसभर त्यांना तिथे बसवलं जायचं. त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. कालही त्यांना बोलावलं, ते गेले पण परत आलेच नाहीत. दहा वाजल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. कांदिवलीहून क्राईम ब्रान्चच्या तावडे नावाच्या व्यक्तीचा कॉल आला होता. त्यांनी घोडबंदर इथे भेटायला बोलवल्याचं सांगितलं. ते गेल्यानंतर अर्ध्या तासात फोन बंद येऊ लागला. आम्ही रात्रभर वाट पाहिली, सकाळपर्यंत न आल्याने आम्ही तक्रारही दाखल केली. पोलीस अधिकाऱ्याला भेटायला जात असल्याचं निघताना सांगितलं. ते कोणत्याही दबावात नव्हते. पोलिसांचा कॉल येत होतो तेव्हा ते जात होतो. त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. आज मीडियामध्ये बातम्या आल्या आणि पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी आत्महत्या केली, हे पूर्णत: खोटं आहे. ते आत्महत्या करु शकत नाहीत. ही अफवा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावं. आमचं पूर्ण कुटुंब भरडलं जात आहे."
दरम्यान या प्रकरणात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खळबळजनक दावा केला आहे. स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे फोनवरुन संवाद झाल्याचं फडणवीस म्हणाले. तसंच हे प्रकरण एनआयएकडे सोपवावं अशी मागणीही त्यांनी लावून धरली. या मुद्द्यावरुन विधानसभेत आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगीही पाहायला मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)