एक्स्प्लोर
मंजुळा शेट्ये हत्या : पोलिसांच्याच सांगण्यावरून जेल अधिकाऱ्यांना गोवले, आरोपींचा कोर्टात दावा
भायखळा जेलमधील वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून याच जेलमधील कैदी भाग्यश्री मांडवकरला शुक्रवारी चौथ्यांदा कोर्टापुढे हजर करण्यात आलं होतं.
मुंबई : मंजुळा शेट्येच्या हत्येशी आपला काहीही संबंध नाही, असा दावा या प्रकरणातील आरोपी बिंदू नाईकवडे आणि वसिमा शेख यांच्या वकिलांनी मुंबई सत्र न्यायालयात केला आहे. केवळ पोलिसांच्याच सांगण्यावरून जेल अधिकाऱ्यांना यात गोवण्यात आल्याचा आरोपही कोर्टात करण्यात आला आहे. 23 जून 2017 ला ज्यादिवशी ही घटना घडली तेव्हा बिंदू नाईकवडे यांची ड्युटी मेनगेटवर तपासणीस म्हणून होती. त्यामुळे त्या जेलच्या आतल्या भागात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तर वसिमा शेख यांना बऱ्याच काळापासून पाठदुखीचा त्रास असल्यानं त्यांना धड चालता किंवा बसताही येत नाही. तर मग त्या एखाद्या कैद्याला मारहाण कशी करू शकतात? असा युक्तिवाद करण्यात आला.
भायखळा जेलमधील वॉर्डन मंजुळा शेट्येच्या हत्याप्रकरणी सरकारी साक्षीदार असलेल्या भाग्यश्री मांडवकर या 'शिक्षण पंचायत'च्या सदस्या आहेत अशी माहिती समोर आली. प्रत्येक जेलमध्ये एक 'शिक्षण पंचायत' असते. ज्यात जेलमधील शिकलेल्या कैद्यांचा समावेश असतो. या कैद्यांवर जे निरक्षर कैदी आहेत त्यांच्या पत्रव्यवहाराची जबाबदारी असते. मात्र आपण स्वत: किंवा इतर कुठल्याही कैद्यासाठी जेल अधिकाऱ्यांची कधीही कोणती तक्रार केली नसल्याची माहिती शुक्रवारी कोर्टाला दिली. त्यामुळे भायखळा जेलमधील तक्रार पेट्या या सतत रिकाम्याच असतात अशी माहिती कोर्टापुढे आली.
भायखळा जेलमधील वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून याच जेलमधील कैदी भाग्यश्री मांडवकरला शुक्रवारी चौथ्यांदा कोर्टापुढे हजर करण्यात आलं होतं. या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी जेलर मनिषा पोखरकर यांच्या वकिलांनी या साक्षीदाराची उलटतपासणी याआधीच संपवली असून शुक्रवारी आरोपी नंबर दोन बिंदु नाईकवडे आणि आरोपी नंबर तीन वसिमा शेख यांच्या वकिलांनीही आपली उलटतपासणी संपवली आहे.
शुक्रवारच्या सुनावणीत सर्व आरोपींना कोर्टापुढे हजर केलं होतं. 4 मार्चला होणाऱ्या पुढील सुनावणीतही मांडवकर यांचीच उलटतपासणी सुरू राहिल. याच सरकारी साक्षीदारानं आरोपींनीच मंजुळा शेट्येला मृत्यूपूर्वी बेदम मारहाण केल्याचं कोर्टात सांगितलं होतं.
मुंबई सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश शायना पाटील यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. मंजुळा शेट्ये प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयानं सहा जणांविरोधात आरोप निश्चित केलेत. कलम 302 नुसार हत्याकरणे, कलम 120 ब नुसार हत्येचा कट रचणे, कलम 201 नुसार पुरावा नाहीसा करणे आणि कलम 501 नुसार मरेपर्यंत मारहाण करणे या कलंमांखाली हे आरोप निश्चित करण्यात आलेत. जेल अधीक्षक मनीष पोखरकरसह महिला जेल पोलीस बिंदू नाईकवडे, वसिमा शेख, शितल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या 6 जेल पोलिसांनी हेतूपरस्पर मंजुळाची हत्या केल्याचा आरोप आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement