(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पतंग विक्रेत्यांवर संक्रांत! लाखो लोकांचा संसार संकटात
कोरोना महामारीमुळे अनेक उद्योगधंदे संकटात आले असून पतंग विक्रेत्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे.‘संक्रांत आठ दिवसांवर आली तरी 40 टक्केही व्यवसाय होऊ शकला नाही.
मुंबई : कोरोनामुळे मुंबईतील पतंग विक्रेत्यांचा व्यवसाय बुडाल्याने यंदा पतंग विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे. दर वर्षी मकरसंक्रांतीचे खास आकर्षण म्हणजे आकाशात होणारी पतंगबाजी असते. मात्र, यंदा कोरोना निर्बंधांमुळे पतंगोत्सवाबाबत उदासीन वातावरण आहे. त्यामध्ये लोकलसेवा बंद असल्याचा फटकाही बसल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा पतंग विक्रीला 60 टक्क्यांचा फटका बसला आहे.
मुंबईच नव्हे तर देशभरात संक्रांतीच्या निमित्ताने पतंगोत्सव साजरा केला जातो. जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या काळात पतंगाला मोठी मागणी असते. परंतु, यंदा मुंबईतील वांद्रे, मोहम्मद अली मार्ग, धारावी इथल्या घाऊक पतंग व्यावसायिकांवर ग्राहकांची वाट पाहण्याची वेळ आली आहे. प्रवासात येणाऱ्या अडचणींमुळे मुंबईबाहेरून येणारे छोटे दुकानदार खरेदीसाठी फिरकत नसल्याची खंत इथल्या व्यापाऱ्यांनी मांडली. ‘संक्रांत आठ दिवसांवर आली तरी 40 टक्केही व्यवसाय होऊ शकला नाही.
नायलॉन मांजामुळे नागपुरात 17 वर्षीय मुलगा गंभीर जखमी दरवर्षी जानेवारी महिन्यात पतंग खरेदीसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात दुकानात बाहेर लगबग सुरू असते. यंदा मात्र सर्वच ठिकाणी शुकशुकाट जाणवत आहे. बहुतांशी विक्रेते बरेली आणि उत्तर प्रदेशातून पतंगांची आयात करतात. संक्रांतीच्या काळात एक लाखांहून अधिक पतंगाची विक्री प्रत्येक दुकानंमध्ये होत असते, यंदा मात्र प्रतिसाद कमी आहे.
कोरोनामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून अनेक उद्योग उद्योगधंद्यांना फटका बसलेला आहे. असाच फटका पतंग विक्रेत्यांना बसलेला आहे. पतंग जरी जीवनावश्यक वस्तू नसली तरीही पतंगबाजी ही हौस म्हणून केली जाते. मात्र, पतंग निर्मितीवर लाखो लोकांचा संसार टिकून आहे. पतंगाची निर्मिती संपूर्ण वर्षभर केली जाते. यंदा कोरोनामुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प असल्यामुळे पतंग निर्मिती करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या नागरिकांवर संक्रांत उडवलेली आहे.
- मुंबईतील या ठिकाणाहून घाऊक विक्रेते आणि नागरिक पतंगांची करतात खरेदी
- दादर ते कल्याणपर्यंतचे ग्राहक धारावीत
- वांद्रे ते डहाणूपर्यंतचे ग्राहक वांद्रे
- दक्षिण मुंबईतला ग्राहकवर्ग मोहम्मद अली मार्ग येथे पतंग खरेदीसाठी जातात.
पतंगांच्या किमती
- 5 रुपयांपासून ते 50 रुपयांपर्यंतचे पतंग बाजारात उपलब्ध आहेत.
- 3 ते 10 रुपयांमध्ये कागदी पतंग, तर त्यावरच्या दरात प्लास्टिक आणि विविध छापील चित्र असलेल्या पतंगांचा समावेश आहे.
- लहान मुलांसाठी कार्टून आणि आकर्षक रंगांचे पतंगही उपलब्ध आहे.
- मांजाच्या किमती 20 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत आहेत.
अनिसा सलीम (पतंग विक्रेत्या) गेल्या तीस वर्षांपासून आम्ही पतंग निर्मिती आणि विक्रीचा व्यवसाय करीत आहोत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने आम्ही पतंगांची विक्री करतो. मात्र, गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोना संकट आल्यानं आम्ही घरामध्ये बसून आहोत. सध्या जनजीवन सुरळीत होत असलं तरीही ही जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही पतंग खरेदी करण्यासाठी ग्राहक अजूनही दुकानांमध्ये आलेले नाहीत. त्यामुळे चिंता वाटत आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात लगबग सुरु असते. यंदा मात्र ग्राहकांची वाट बघण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे.
मोहम्मद नईम कुरेशी ( पतंग विक्रेता ) सामान्य पतंग शौकीनान पासून चित्रपटात चित्रित करण्यासाठी लागणारे पतंग आमच्या दुकानातून घेऊन जातात. जगभरातील व्हरायटी आमच्याकडे उपलब्ध आहे. कागदी पतंगापासून प्लास्टिक आणि कापडी पतंग ही तयार करतो. मात्र, गेल्या नऊ महिन्यांपासून कोणत्याच पतंगांच्या प्रकाराची विक्री झालेली नाही. माल आहे तसा गोडाउनमध्ये पडून राहिलेला आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने जानेवारी महिन्यांमध्ये पतंगांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. यंदा मात्र तसं चित्र दिसत नाही. दरवर्षी पेक्षा केवळ 30 टक्केच व्यवसाय झालेला आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ आमच्यावर आली आहे.