नायलॉन मांजामुळे नागपुरात 17 वर्षीय मुलगा गंभीर जखमी
नागपुरात बंदी असलेल्या नॉयलॉन मांजामुळं गळा कापल्यामुळं एक 17 वर्षीय आदित्य भारद्वाज गंभीर जखमी झाला आहे.
नागपूर : नागपुरात बंदी असलेल्या नॉयलॉन मांजामुळं गळा कापल्या गेल्यामुळं आज एक 17 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. आदित्य भारद्वाज असं जखमी मुलाचं नाव आहे.
आदित्य आज सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास मानकापूर परिसरातील गोधनी मार्गावरून बाईकनं त्याच्या कॉम्प्युटर क्लासला जात होता. तेव्हा त्याच्या बाइकसमोर अचानक हवेतून नॉयलॉन मांजा आडवा आला. त्यामुळं आदित्यचा गळा नॉयलॉन मांजामुळं कापला गेला. रक्त बंबाळ अवस्थेत आदित्य दुचाकीवरून खाली कोसळला आणि बरेच लांब फरफटत गेला. आजूबाजूच्या लोकांनी त्याला उपचाराकरीता जवळील स्पर्श हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र त्याची स्थिती जास्त गंभीर असल्याने त्याला एलेक्सिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
दोन महिन्यांपूर्वीच आदित्यच्या वडिलांचं कोरोनामुळं निधन झाले आहे. त्यात आदित्यचा नॉयलॉन मांजामुळं झालेल्या अपघातामुळं त्याची आई आणि लहान भावासमोर मोठं संकट निर्माण झाले आहे. या घटनेमुळं बंदी असलेला नॉयलॉन मांजाचा वापर अजूनही काही पतंगबाज करत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. यापूर्वी नागपुरात नॉयलॉन मांजानं अनेकांचा जीव घेतला आहे. काही दिवसनपूर्वी एकापोलीस कर्मचाऱ्यालाही नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी व्हावे लागलं होते.
कमी पैशांत न तुटणाऱ्या मांजाची सध्या क्रेझ आहे. पतंग उडवणाऱ्यांना हा मांजा आनंद देत असला तरी तो वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे. कमी जाडीचा मांजा डोळ्याला दिसत नाही. परिणामी मुख्य रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना मांजा कापल्याने जीवघेण्या दुखापती झाली आहेत. त्यामुळे तुमचा शौक दुसऱ्याच्या जीवावर उठत असेल तर सावधान!