(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सुधीरभाऊंच्या 'त्या' आव्हानावर अजित दादा म्हणाले, 'तुमचं आव्हान स्वीकारतो, मला पाडून दाखवा'
विधिमंडळाच्या दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनात काही मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधी पक्ष चांगलेच भिडल्याचे चित्र आहे. आज दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशीही वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. त्यात सुधीर मुनगंटीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातली जुगलबंदी चर्चेचा विषय ठरली.
मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनात काही मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधी पक्ष चांगलेच भिडल्याचे चित्र आहे. आज दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशीही वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. त्यात सुधीर मुनगंटीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातली जुगलबंदी चर्चेचा विषय ठरली. त्याचं झालं असं पुरवणी मागण्यांवर आज विधानसभेत चर्चा सुरु होती. त्यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार आपले मुद्दे ठेवत असताना कुणीतरी एक सदस्य मध्येच बोलण्यासाठी उभा राहिला. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही, असं म्हटलं. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुनगंटीवार यांना मी तुमचं आव्हान मी स्वीकारतो मला पाडून दाखवा, असं थेट आव्हान दिलं.
यावर पुढे मुनगंटीवार म्हणाले की, जुलै महिन्यांत अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजींचा वाढदिवस असतो. त्यामध्ये आई वडिलांची सेवा आणि त्याचे विचार पुढे नेले पाहिजे असं राशीत लिहिलंय. माझ्यासमोर आज बाळासाहेब ठाकरे दिसत आहेत, असा टोला मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला.
विधानसभेत 21 हजार 99 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर
आरक्षणाच्या मुद्यावरून नाराज असलेल्या मराठा आणि ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पुरवणी मागण्यात या दोन्ही समाजासाठी तरतूद केली आहे. विधानसभेत आज 21 हजार 99 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. यात ओबीसी समाजाच्या महाज्योती संस्थेला 81 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महाज्योती संस्थेला पैसे देण्याची मागणी मागील काही दिवसांपासून होत होती. याचबरोबर ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी 11 कोटींची तरतूद पुरवणी मागण्यात करण्यात आली आहे. भटक्या जमाती, विमुक्त जमातींच्या आश्रमशाळांसाठी 216 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने आक्रमक असलेल्या मराठा समाजाच्या सारथी संस्थेसाठी 80 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सारथी संस्थेला निधी मिळावा यासाठी अनेक आंदोलनेही झाली होती. तर पुरवणी मागण्यात इंदु मिलसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पुरवणी मागण्यातील इतर काही महत्त्वाच्या तरतुदी - पिक नुकसानीचे शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 2211 कोटी रुपयांची तरतूद - धान उत्पादकांना बोनस देण्यासाठी 2850 कोटी - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई आणि नागपूर येथील विधानभवनात निगेटीव्ह प्रेशर राखणारी वातनुकुलीत यंत्रणा बसवण्यासाठी 22 कोटी रुपये - आमदार निवास बंद असल्याने आमदारांच्या निवास व्यवस्थेसाठी 8 कोटींची तरतूद - आमदार विकास निधीसाठी 476 कोटींची तरतूद