Sanjay Raut On Shivsena Symbol: शिवसेनेचे धनुष्यबाण गोठवलं, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Sanjay Raut On Shivsena Symbol: शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पर्यायी चिन्हांची घोषणा केली. त्यावर अटकेत असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Sanjay Raut On Shivsena Symbol: शिवसेना ठाकरे गटासमोर संकटाची मालिका सुरू झाली असताना दुसरीकडे शिवसैनिकांना शिवसेनेची तोफ समजल्या जाणाऱ्या संजय राऊतांची उणीव भासत आहे. संजय राऊत यांनीदेखील आता या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे नवीन चिन्ह क्रांती घडवून आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तुरुंगात असलेल्या संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यावेळी कोर्टाच्या आवारात शिवसैनिक, माध्यम प्रतिनिधींसोबत त्यांनी अनौपचारिक संवाद साधला.
पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात संजय राऊत यांनी आर्थिक घोटाळा केला असल्याचा ठपका ठेवत ईडीने त्यांना अटक केली आहे. संजय राऊत सध्या न्यायलयीन कोठडीत असून त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी संजय राऊत यांना कोर्टात आणण्यात आले होते. त्यावेळी राऊत यांच्या नातेवाईकांसह शिवसैनिकांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावेळी संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. संजय राऊत यांनी म्हटले की, शिवसेना पक्षाचे नवीन चिन्ह कदाचित क्रांती घडवून आणेल आणि भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ. आमच्यात शिवसेनेचं 'स्पिरीट' असल्याचे त्यांनी सांगितले. या आधीही जनसंघ, काँग्रेस यांच्यावरही चिन्ह गोठवण्याची वेळ आली होती. यात काही नवीन नाही. नवीन चिन्हानंतर हे पक्षही मोठे झाले. आपणही मोठे होऊ असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. खरी शिवसेना कोणती आहे, हे लोकांना ठाऊक आहे. त्यामुळे चिन्ह बदललं तरी लोक आपल्याशी जोडले जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ठाकरे गटांकडून तीन चिन्हांचा पर्याय
शिवसेना ठाकरे गटांकडून निवडणूक आयोगाला तीन निवडणूक चिन्हांचा पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. त्याशिवाय, पक्षाच्या नावांसाठी तीन पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये शिवसेना-बाळासाहेब ठाकरे, शिवसेना-बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन नावांचा समावेश आहे.
तर, दुसऱ्या बाजूला शिंदे गटानेदेखील ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे म्हटले जात आहे. शिंदे गटानेदेखील निवडणूक आयोगाला दिलेल्या चिन्ह्यांच्या पर्यायात उगवता सूर्य आणि त्रिशूळचा पर्याय दिल्याची माहिती आहे. तर, पक्षाच्या नावातही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.