मोठी बातमी, धुळ्यातील विश्रामगृहात सापडलेल्या 1 कोटी 82 लाखप्रकरणी विधिमंडळाकडून चौकशी होणार, किशोर पाटील संदर्भात धक्कादायक माहिती समोर
Dhule Cash Case : धुळ्यातील गुलमोहर रेस्ट हाऊसच्या 1 कोटी 82 लाख रुपये प्रकरणाची विधिमंडळाकडून चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मुंबई : धुळे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये विकास कामांची पाहणी करण्यासाठी जवळपास 11 आमदारांचे शिष्ट मंडळ धुळ्यात दाखल झालं होतं. धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस या ठिकाणी जालना विधानसभा मतदारसंघाचे अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने रूम नंबर 102 4 ते 5 दिवसांपासून बुक करण्यात आली होती गुलमोहर रेस्ट हाऊसच्या खोलीतून 1 कोटी 82 लाख रुपये प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. धुळे प्रकरणातील आरोपी किशोर पाटील याची विधिमंडळातील नियुक्ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे या दोघांनीही फेटाळली होती, अशी माहिती एबीपी माझाला विधिमंडळातील वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली होती.
नियुक्ती फेटाळूनही किशोर पाटील खोतकरांसोबत
विधिमंडळातील दोन्ही वरिष्ठांनी नियुक्ती फेटाळून देखील किशोर पाटील अंदाज समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर यांच्या सोबत काम करत असल्याचं समोर आलं आहे. संबंधित अधिकारी नियुक्ती नसताना देखील अंदाज समितीच्या प्रमुखांसोबत काय करत होता याची विधिमंडळाकडून लवकरच चौकशी करण्यात येणार आहे. विधिमंडळातील सदस्यांची लवकरच एक समिती स्थापन होऊन संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करण्यात येणार आहे. एकीकडे पोलिसांची एसआयटी तपास करणार तर दुसरीकडे पाटील याच्या अनाधिकृत घुसखोरी बाबत विधिमंडळाची समिती चौकशी करणार आहे, अशी माहिती एबीपी माझाला विधिमंडळातील वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे.
नेमकं काय प्रकरण?
धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस या ठिकाणी जालना विधानसभा मतदारसंघाचे अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने रूम नंबर 102 गेल्या 4 ते 5 दिवसांपासून बुक करण्यात आली होती. शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचल्यानंतर विकासकामांमध्ये त्रुटी आढळून आल्यान शासकीय कार्यालयांमधून या ठिकाणी कोट्यावधी रुपये पोहोच करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडून करण्यात आला होता.
शासकीय विश्रामगृहातील रूम नं 102 ची तपासणी करण्यात यावी या मागणीसाठी अनिल गोटे यांनी 21 मे रोजी 3 ते 4 तास कुलूपबंद रूम बाहेर ठिय्या मांडला होता . जालनाच्या आमदारांच्या स्वीय सहायकाच्या नावानं बुक असलेल्या रूममध्ये कोट्यवधी रुपये शासकीय कार्यालयामधून आले असल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केल्या नंतर रात्री उशिरा प्रशासन ने शासकीय विश्राम गृहाचे 102 रूम चे कुलूप तोडून अखेर तपासणी केल्या नंतर त्या रूम मध्ये तब्बल 1 कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपये इतकी रोकड मिळून आली होती. 22 मेच्या पहाटेपर्यंत 3 मशीन द्वारे पहाटे उशिरा पर्यंत रोकड मोजण्याचे काम सुरू होते.
























