पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब पाच हजार रुपये रोख अर्थसहाय्य देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतून 4 लाख 13 हजार 985 नागरिकांना 535 आश्रय शिबीरात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यात 80, कोल्हापूर जिल्ह्यात 150 आणि सातारा जिल्ह्यात 72 वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.
मुंबई : पूरपरिस्थितीत बाधीत झालेल्या नागरिकांना प्रतिकुटुंब रोख पाच हजार अर्थसहाय्य तातडीने वितरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
पूरग्रस्त नागरिकांना रोख रकमेचे वितरण करण्यासोबतच नादुरुस्त पाणीपुरवठ्याच्या योजना तातडीने दुरुस्त करुन नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. बाधीत गावांमध्ये स्वच्छतेची मोहीम प्राधान्याने हाती घेण्यासोबतच रस्ते, पुलांच्या दुरुस्तीसह गावांमध्ये जनजीवन सुरळीत होण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतून 4 लाख 13 हजार 985 नागरिकांना 535 आश्रय शिबीरात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यात 80, कोल्हापूर जिल्ह्यात 150 आणि सातारा जिल्ह्यात 72 वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.
सांगली जिल्ह्यात 66 रस्ते वाहतूकीसाठी बंद असून 33 पूल पाण्याखाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 91 रस्ते वाहतूकीसाठी बंद असून 39 पूल पाण्याखाली आहेत. सातारा जिल्ह्यात 5 रस्ते वाहतूकीसाठी बंद असून 3 पूल पाण्याखाली आहेत. सोलापूर जिल्ह्यात 33 रस्ते बंद असून 14 पूल पाण्याखाली आहेत.
पूरपरिस्थितीमध्ये कोल्हापूर, सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी,रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 70 तालुके बाधीत झाले आहेत. बाधीत गावांची संख्या 761 इतकी आहे. या सर्व ठिकाणी मदत कार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे.