Mumbai Corona Restriction : मुंबईची चिंता वाढली; दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ, लवकरच लॉकडाऊन?
Mumbai Corona Restriction : मुंबईची चिंता वाढली असून दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. अशातच मुंबईची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेनं होतेय की, काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
Mumbai Corona Restriction : संपूर्ण जगासह देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं धाकधुक वाढवली आहे. सध्या राज्यातही कोरोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे. मुंबईत कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकड्यामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अगदी शंभरीच्या घरात गेलेल्या मुंबईतील दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा सध्या 10 हजारांच्या वर पोहोचला आहे. मुंबईत काल (मंगळवारी) दिवसभरात 10 हजार 860 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत 40 ओमायक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अशातच मुंबईत लॉकडाऊन लावण्याची गरज आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच मुंबईतील दैनंदिन कोरोनाचे आकडे जर 20 हजारांच्या पार पोहोचले, तर मात्र मुंबईत कठोर निर्बंध लावण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे संकेत मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबईचा दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा पाहता लवकरच मुंबईत लॉकडाऊन लावला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबईची चिंता वाढली
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या ही सातत्याने वाढतच आहे. देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये ही रुग्णसंख्या वेगाने वाढताना दिसत आहे. मुंबईत काल (मंगळवारी) 10 हजार 860 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत एकूण 654 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे 92 टक्क्यांवर पोहोचलं आहे. सोमवारच्या तुलनेत काल कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून तो चिंतेचा विषय आहे. मुंबईत कालपर्यंत एकूण 7 लाख 52 हजार 012 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात सध्या 47 हजार 476 सक्रिय रुग्णसंख्या आहे. रुग्णदर दुप्पट होण्याचा कालावधी घटला असून तो 110 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोना रूग्णांचा 20 हजारांचा आकडा पार झाला तर राज्य सरकार आणि महापालिकेच्या नियमानुसार, मुंबईत कडक निर्बंध लावावे लागतील असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
पाहा व्हिडीओ : तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्राने दिलेला निधी महाराष्ट्र सरकारकडून खर्चच नाही
BMC कडून इमारत सील करण्याबाबत सुधारीत नियम जाहीर
मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना आखल्या जात आहेत. प्रशासनाकडून निर्बंधाबाबतची नियमावली जाहीर करण्यात येत आहे. कोरोनाबाधित व्यक्ती असलेली इमारत सील करण्याबाबत मुंबई महापालिकेने सुधारीत नियमावली जाहीर केली आहे.
एखाद्या इमारतीत किंवा विंगमध्ये राहत असलेल्या एकूण रहिवाशांपैकी 20 टक्के रहिवाशांना कोरोनाची बाधा झाल्यास संबंधित इमारत किंवा विंग सील केली जाणार आहे. कोरोनाबाधित व्यक्तींना होम क्वारंटाइनसाठी देण्यात आलेल्या निर्देशांचे आणि नियमांचे सक्तीने पालन करावे लागणार आहे. हाय रिस्क संपर्कातील व्यक्तींना सात दिवस होम क्वारंटाईन राहावं लागेल. ते 5 व्या किंवा सातव्या दिवशी आरटीपीसीआर करू शकतील. जर लक्षण आढळल्यास तात्काळ आरटीपीसीआर करावी लागेल असेही महापालिकेच्या नव्या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.
इमारतीमध्ये कोरोनाबाधित व्यक्ती असल्यास त्यांच्या घरी औषधे, खाद्यपदार्थ आणि जीवनावश्यक वस्तू पोहचवण्याची जबाबदारी संबंधित इमारतीच्या सोसायटीवर असणार आहे असे मुंबई महापालिकेने म्हटले आहे. त्याशिवाय सील केलेली इमारत पुन्हा खुली करण्याबाबतचा निर्णय वॉर्ड पातळीवर घेण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेचे आरोग्य अधिकारी, वॉर्ड वॉर रुमकडून कोव्हिड प्रोटोकॉल आणि इतर गोष्टींबाबत सहकार्य केले जाईल असेही महापालिकेने म्हटले आहे. या नव्या निर्देशांची अंमलबजावणी 4 जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे ही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
...तर मुंबईत कठोर निर्बंध : BMC महापौर किशोरी पेडणेकर
मुंबईत कोरोना (Corona) रूग्णांचा 20 हजारांचा आकडा पार झाला तर राज्य सरकार आणि महापालिका नियमानुसार मुंबईत कडक निर्बंध लावावे लागतील, अशी माहिती BMC महापौर किशोरी पेडणेकर ( kishori pednekar) यांनी दिली. गेल्या आठ दिवसांपासून राज्यासह मुंबईत वाढत असलेली कोरोना रूग्णांची आकडेवारी चिंताजनक आहे. याच पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महापालिकेने कोरोना विरोधात लढण्यासाठी केलेल्या तयारीची माहिती दिली. त्याबरोबरच BMC आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे मुंबईत 20 हजार कोरोना रूग्णांचा टप्पा पार झाला तर मिनी लॉकडाऊन लावावा लागेल, असे सांगितले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mumbai Corona Update : रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय, पण लक्षणं नसलेल्यांची संख्या अधिक, पालिकेची रुग्णव्यवस्था सज्ज
- ...तरच कोरोनाबाधित असलेली इमारत सील करणार; BMC कडून इमारत सील करण्याबाबत सुधारीत धोरण जाहीर
- ...तर मुंबईत लॉकडाऊन; मुंबई महापालिका आयुक्तांचे संकेत
- Coronavirus Omicron Variant : लहान मुलांना देखील ओमायक्रॉनचा धोका? पाहा काय म्हणाले तज्ज्ञ
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह