Eknath Shinde : 'आरक्षण मिळणारच', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मराठा समाजाला शब्द
Eknath Shinde : थोडा धीर धरा, सरकारला वेळ द्या असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला केलं आहे.
मुंबई : 'मराठा समाजाला आरक्षण मिळणार हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे', असं मुख्यमंत्री म्हणाले. मराठा समाजातील लोकांनी आत्महत्या करणं ही बाब अत्यंत दु:खद असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिलं. यामध्ये 'अनेक कायदेशीर बाबी आहेत, त्या पूर्ण करण्याचं काम सुरु आहे', त्यामुळे मराठा समाजाच्या बांधवांनी थोडा धीर धरावा असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं. मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम येत्या 24 तारखेला संपणार आहे. त्यानंतर त्यांनी आमरण उपोषणाची हाक दिली.
मनोज जरांगे यांनी त्यांच्या आजच्या सभेमध्ये त्यांची पुढची भूमिका स्पष्ट केली आहे. तर मराठा आरक्षणासाठी काही दिवसांपासून आत्महत्येचा घटना देखील समोर येत आहेत. या सर्व गोष्टींवर मुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केलं आहे.
टोकाचं पाऊल उचलू नका - मुख्यमंत्री शिंदे
आरक्षण देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं. मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मी दिलेला शब्द पाळणारच.अतिशय संवदेनशील घटना घडतायत. त्यामुळे कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
आरक्षणाच्या आशा सर्वोच्च न्यायालायात पुन्हा पल्लवित
'जे आर्थिक घटकांमधून आरक्षण दिलं होतं ते उच्च न्यायायलयात टिकलं पण सर्वोच्च न्यायालायामध्ये ते आंदोलन टिकू शकलं नाही. पण आता क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालायाने दाखल करुन घेतली. त्यामध्ये मराठा आरक्षण प्रकरणात लक्ष घालणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने देखील म्हटलं. मागील वेळेस ज्या गोष्टी सुप्रीम कोर्टात मांडता आल्या नाहीत त्या सर्व बाबी यावेळी मांडण्यात येतील', असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आरक्षण देण्याची जबाबदारी आमची - मुख्यमंत्री शिंदे
कुणबी प्रमाणपत्रावर युद्धपातळीवर काम सुरु असल्याचं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितलं. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'ज्याप्रमाणे सरकाराने शब्द दिला आहे त्याचप्रमाणे या मुद्द्यावर काम सुरुये. आपल्या मराठा समाजातील तरुणांचा जीव इतका स्वस्त नाही. म्हणून या तरुणांनी त्यांच्या घरच्यांचा विचार करायला हवा. मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी ही आमची आहे. त्यानुसार आम्ही मराठा समाजाला जास्तीत जास्त लाभ देण्याचे प्रयत्न करत आहोत. '
आम्ही मराठा समाजाच्या बाजूनेच
'दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी आम्ही मराठा समाजाच्या बाजूनेच आहोत. मी कोणतीही खोटी आश्वासनं देत नाही. त्यामुळे सरकार हे मराठा समाजाच्या बाजूने आहे. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला मिळेल', असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
सध्या राज्यात मराठा आरक्षणचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यातच मराठ्यांना आरक्षण मिळणारच असा शब्द यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी अल्टिमेटम संपल्यानंतर आमरण उपोषणची हाक दिलीये. यामध्ये आता सरकार कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.