Ratan Tata Death: रतन टाटांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाही, NCPAमध्ये घेता येणार पार्थिवाचे अंत्यदर्शन
Ratan Tata Death: रतन टाटा यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर राज्यात आज (गुरुवारी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतील. त्याचबरोबर मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम आज होणार नाहीत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. (Ratan Tata Death)
आज (गुरूवारी) दुपारी 3.30 वाजता रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर देशभरात हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.दानशूर, दयाळू, दिलदार, देशप्रमी, नफा-तोटा न पाहणारा उद्योगपती अशी रतन टाटा (Ratan Tata) यांची ओळख होती. त्यामुळे रतन टाटा यांच्या निधनानं देशाची मोठी हानी झाली आहे. रतन टाटा यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
Maharashtra govt has declared one day of mourning in respect of Ratan Tata. All govt buildings will have the national flag at half mast and no cultural or entertainment programme of the govt will be held today. Ratan Tata’s funeral will be conducted with all state honours: CMO… pic.twitter.com/iO2tIZ8TmB
— ANI (@ANI) October 10, 2024
पीएम मोदींनी नोएल टाटा यांच्याशी साधला संवाद
रतन टाटा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून नोएल टाटा यांच्याशी बोलून संवेदना व्यक्त केल्या आहेत, पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी लाओसला रवाना झाले आहेत, त्यामुळे ते रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहू शकत नाहीत, त्यामुळे त्यांनी फोनवरून नोएल टाटा यांच्याशी संवाद साधला, तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे भारत सरकारच्या वतीने रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. यासंबधीची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
NCPA मध्ये घेता येणार रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नरिमन पॉईंट येथील एनसीपीए येथे आणण्यात येणार आहे. रतन टाटा यांचे पार्थिव एनसीपीए येथे दर्शनासाठी ठेवण्यात येत आहे.
रतन टाटा यांची कारकीर्द-
- जन्म - 28 डिसेंबर 1937, वय 86 वर्ष
- 1961-62 टाटा स्टीलमध्ये सामान्य कर्मचारी म्हणून रुजू
1991 मध्ये टाटा ग्रुपच्या चेअरमनपदी, जेआरडी टाटांनी पद सोपवलं
- चेअरमनपद हाती घेतल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांची स्वतःची हिस्सेदारी वाढवली
- 1998 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची 'इंडिका' कार टाटा मोटर्सने बनवली (रतन टाटांचं स्वप्न पूर्ण)
- एका कुटुंबाला मोटारसायकलवर प्रवास करताना पाहून स्वस्तात कार बनवण्याची कल्पना सुचली
- 2008 मध्ये रतन टाटांच्या मार्गदर्शनात टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली
- 2012 मध्ये टाटा सामूहाच्या चेयरमनपदाचा राजीनामा, सायरस मेस्त्रीकडे पदभार दिला
- मेस्त्रीसोबतच्या वादानंतर 2016 मध्ये पुन्हा वर्षभर टाटा समूहाच्या चेयरमनपदी
- नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहाचे चेयरमन
- रतन टाटांच्या पश्चात धाकटे भाऊ जिम्मी टाटा, नोएल टाटा हे दोन भाऊ आहेत. तर नोएल टाटा यांना लेह टाटा, माया टाटा, नेव्हिल टाटा ही 3 मुले आहेत.