(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने महाराष्ट्र भाजपचं शक्तिप्रदर्शन, मुंबई भाजप कसा करणार जल्लोष?
अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार आहे. या निमित्ताने भाजप विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करणार आहे. भूमिपूजन सोहळा जल्लोषात साजरा करण्याचं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
मुंबई : अयोध्येतील राम मंदिराचा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी प्रदेश भाजपने जय्यत तयारी सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्या घराघरात दिवाळी साजरी करण्याचे मात्र त्याचसोबत कोरोनाचं भान जपण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. घरावर रोषणाई करावी, गुढी उभारावी, कंदील लावावा आणि घरासमोर पणत्या-रांगोळी काढून धुमधडाक्यात सोहळा साजरा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचसोबत मुंबईत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजप शक्तिप्रदर्शन करताना दिसेल.
कसा असेल मुंबई भाजपचा जल्लोष?
मुंबई भाजपतर्फे प्रत्येक वॉर्डमध्ये हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. भाजपाच्या मुंबईतील सर्व कार्यालयांवर दिव्यांची आरास करण्यात येणार आहे. तसेच काही चौकात श्रीरामाचे पूजन करुन मुंबईभरात अनेक ठिकाणी लाडू, पेढे आणि मिठाई वाटण्यात येणार आहे.
जल्लोषाची सुरुवात करण्यासाठी आज मंगळवारी 4 ऑगस्टला दादर येथे भाजपच्या मुंबई मुख्यालयात (वसंत स्मृती) गीतरामायणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 1990 आणि 1992 मधील कारसेवकांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात येईल. वाळकेश्वरमधील बाणगंगा येथे आज संध्याकाळी दीपोत्सव आयोजित केला असून तेथील 125 मंदिरांच्या पुजाऱ्यांच्या हस्ते श्रीरामाची आरती करण्यात येईल.
गिरगावात प्रत्येक मंदिरात भूमिपूजनाच्यावेळी दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. संपूर्ण गिरगाव भगव्या ध्वजांनी सजवण्यात येणार आहे
उत्तर मुंबईत सर्व नगरसेवक कार्यालये दिव्यांनी सजवण्यात येणार आहेत. बोरिवलीत अनेक चौक फुलांनी आणि रांगोळ्यांनी सजवण्यात येणार आहेत. बोरिवलीत सहा ठिकाणी घंटानाद करण्यात येणार आहे. सर्व मंदिरात दीपोत्सव करण्यात येणार आहे.
उत्तर मध्य मुंबईत सर्व दिव्यांची आरास, आरती, रंगावली, मंदिरांवर पुष्पवर्षाव अशा स्वरुपात श्रीरामजन्मभूमी मंदिर भूमिपूजन साजरे होईल. तर उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबईत प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दोन ते तीन ठिकाणी सुंदरकांड वाचन, भजन कीर्तन असे कार्यक्रम होतील.
उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबईत प्रत्येक वॉर्डमध्ये असेच श्रीरामपूजन, मिठाई वाटप, सुंदर कांड वाचन, असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.
मुंबईतले भाजप आमदार कसा साजरा करणार राम मंदिर भूमिपूजन उत्सव?
आमदार पराग आळवणी यांच्या विलेपार्ले क्षेत्रात प्रत्येक चौकात भव्य श्रीरामपूजन आयोजित करण्यात आलेले आहे. पाऊस नसेल तर अनेक ठिकाणी एलईडी स्क्रीनवरुन अयोध्येतील श्रीराममंदिराच्या भूमिपूजनाचा थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. प्रत्येक चौकात पेढे वाटप केले जाणार आहे.
आमदार राहुल नार्वेकर ठाकूरद्वार येथील श्रीराम मंदिरात दुपारी दीपोत्सवास साजरा करतील. येथे आरती करण्यात येईल तर कुलाबा येथे मारुती मंदिरात रात्री मोठी पूजा आयोजित करण्यात आली आहे.
घाटकोपर पूर्व येथे आमदार पराग शाह यांच्या क्षेत्रात भाजप कार्यालयात दुपारी 11 वाजता भव्य श्रीरामपूजन आयोजित केले आहे.
तर आमदार प्रसाद लाड यांच्या क्षेत्रात शिव सर्कल येथे मोठ्या एलईडी स्क्रीनवरुन अयोध्येतील भूमिपूजनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. शिव परिसरात प्रत्येक मंदिरांवर दिव्यांची आरास करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी मिठाईचे वाटपही करण्यात येणार आहे.
आमदार सुनील राणे बोरिवली येथे नाटकवाले लेन येथे दुपारी 12 वाजता होणाऱ्या घंटानादास उपस्थित असतील. तर आमदार विद्या ठाकूर त्यांच्या क्षेत्रात होणाऱ्या विविध कार्यक्रमास उपस्थित असतील.
आमदार तामिळ सेल्वम यांच्या सायन कोळीवाडा क्षेत्रात देवी मंदिरात पूजा आयोजित केली आहे. त्याचबरोबर औषधे आणि धान्य वाटपही करण्यात येणार आहे.
आमदार कालिदास कोळंबकर यांच्या वडाळा क्षेत्रात त्यांच्या कार्यालयात श्रीरामपूजन आयोजित केले आहे. त्याचबरोबर दहा हजार लाडूंचे वाटप करण्यात येणार आहे.
आमदार मनीषा चौधरी यांच्या क्षेत्रात प्रत्येक वॉर्ड मध्ये लाडू वाटप करण्यात येणार आहे. भाजप कार्यालयांचा संपूर्ण रस्ता रोषणाईने सजवण्यात येणार आहे. मंगळवारी 4 ऑगस्टला सायंकाळी आमदार मनीषा चौधरी यांच्यातर्फे दहा हजार पणत्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
तर आमदार आर.एन.सिंग हे बांद्रा येथे उत्तर भारतीय संघाच्या श्रीरामपूजन आणि मिठाई वाटपाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत