खारघर पाळणाघर मारहाण प्रकरण, आरोपी आयाला दहा वर्षाचा सश्रम कारावास
आरोपीला कलम 307 आणि 325 अन्वये आरोपी अफसानाला न्यायालयाने दहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे, तर एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. अलिबाग सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अ. सो. वाघवसे यांनी हा निकाल दिला.
मुंबई : खारघरमधील पूर्वा प्ले स्कूलच्या पाळणाघरात चिमुकलीला बेदम मारहाणप्रकरणी मुख्य आरोपी अफसाना नासीर शेखला न्यायालयाने दहा वर्षाची सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर इतर दोन आरोपी प्रविण निकम आणि प्रियांका निकम यांची निर्दोष मुक्तता केली आहे. नोव्हेंबर 2016 मधील हे प्रकरण आहे.
पूर्वा प्ले स्कूलची आया अफसाना नासीर शेखने नर्सरीतील रितीशा नावाच्या दहा महिन्याच्या चिमुकलीला क्रूरपणे मारहाण केली होती. याप्रकरणी कलम 307 आणि 325 अन्वये आरोपी अफसानाला अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे, तर एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. अलिबाग सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अ. सो. वाघवसे यांनी हा निकाल दिला.
काय आहे घटना?
खारघर सेक्टर 10 मध्ये पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरी आहे. या ठिकाणी रितीशा नावाच्या दहा महिन्याच्या चिमुकलीला तिच्या पालकांनी प्ले स्कूलमध्ये ठेवलं होतं. तेथे अफसाना नासीर शेख आया म्हणून कामाला होती. मात्र रितीशा झोपत नाही, याचा राग आल्याने अफसानाने रितीशाला निर्दयीपणे अक्षरश: लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तिच्या डोळ्याची मिरची पावडर टाकून आणि गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्नही अफसानाने केला. या मारहाणीत रितीशाच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती.
याप्रकरणी रितीशाच्या पालकांनी प्ले स्कूल चालक प्रविण निकम, प्रियांका निकम, आया अफसाना नासीर शेखविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. रितीशाला तिच्या पालकांनी पाळणाघरात सुरक्षित सांभाळ करण्यासाठी ठेवलं होतं. मात्र प्रविण निकम आणि प्रियांका निकम यांनी निष्काळजीपणे आया अफसानाच्या हाती आपल्या मुलीला दिल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र प्रविण निकम, प्रियांका निकम यांनी आज निर्दोष मुक्तता झाली आहे.