एक्स्प्लोर
भेंडीबाजारातील त्या इमारतीचं काय? : विखे पाटील
कमला मिल कम्पाऊंडच्या आगीतील 14 जणांचे मृत्यू हे मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे बळी आहेत, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी

मुंबई: कमला मिल कम्पाऊंडच्या आगीतील 14 जणांचे मृत्यू हे मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे बळी आहेत, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या अग्नितांडवासाठी सर्वप्रथम मुंबई महानगर पालिकाच जबाबदार आहे आणि त्याच महापालिकेच्या आयुक्तांकडून चौकशी करणे म्हणजे निव्वळ मलमपट्टी ठरेल. या घटनेची आयुक्तांमार्फत होणारी चौकशी आम्हाला मान्य नसून, मागील २ वर्षात मुंबईत इमारत कोसळून आणि आगी लागून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या सर्वच घटनांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. मुंबई शहर भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीच्या तोंडावर असून, आणखी किती मुंबईकरांना आपले प्राण देऊन या अव्यवस्थेची किंमत मोजावी लागेल, अशी विचारणा विखे पाटील यांनी केली. अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा पोलिसांनी संबंधित हॉटेलमालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले आहेत. परंतु, या घटनेसाठी हॉटेलमालकांसोबतच महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर, नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांपासून आयुक्तांपर्यंत सारेच दोषी आहेत. या हॉटेलमध्ये अनधिकृत बांधकाम झालेले होते, बांधकामामध्ये आगीला पोषक असे साहित्य मोठ्या प्रमाणात वापरण्यात आले होते, आग लागल्यास ती विझविण्याची सक्षम यंत्रणा तर सोडाच पण बाहेर पडण्याचा सुरक्षित मार्ग देखील या ठिकाणी उपलब्ध नव्हता. या साऱ्या त्रुटींसाठी केवळ हॉटेलमालकच नव्हे तर मुंबई मनपा देखील तेवढीच जबाबदार आहे, असं विखे पाटील म्हणाले. येथील अनधिकृत बांधकामाबद्दल मुंबई महापालिकेकडे लेखी तक्रारसुद्धा करण्यात आली होती. तरीही त्याकडे दुर्लक्ष करुन १४ जणांच्या मृत्युसाठी कारणीभूत ठरल्याबद्दल मनपा अधिकाऱ्यांवर सुद्धा सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. मुंबई महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचाराला राजाश्रय असल्याने सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न करता वाट्टेल ते परवाने सहजगत्या उपलब्ध आहेत. त्याविरूद्ध आक्षेप नोंदवल्यास त्याची दखलही घेतली जात नाही. त्यामुळेच मुंबई शहरात नित्यनेमाने कधी इमारत कोसळून तर कधी आग लागून अनेकांचे मृत्यू होत आहेत. भेंडीबाजारातील इमारतीचं काय? भेंडीबाजार परिसरात फक्त लोखंडी ग्रिलचा वापर करून ९ मजली इमारत उभी होते आहे. त्याविरुद्ध तक्रारी झालेल्या असतानाही त्याची दखल घ्यायला महापालिका तयार नाही. भविष्यात ही इमारत कोसळून अघटीत घडले तरच मनपाला जाग येईल. दरवेळी केवळ तोंडदेखील कारवाई करून अशा दुर्दैवी घटनांना दडपले जात आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. ग्राहकांची सुरक्षा धोक्यात मुंबईत सध्या सुरू असलेल्या हॉटेल्समध्येच ग्राहकांची सुरक्षितता धोक्यात आहे. त्याकडे लक्ष देण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला वेळ नाही आणि त्यांचे नेते रूफ टॉप हॉटेल्सचा आणखी एक बालहट्ट धरून बसले आहेत. कमला मिल कंपाऊंडमधील हॉटेलदेखील छतावर होते. पण आग लागल्यानंतर खाली उतरायला जागाच नसल्याने अनेकांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला. शिवसेना नेत्यांच्या रूफ टॉप हॉटेलच्या धोरणामुळे हा आगीच्या घटनांचा धोका अधिक वाढण्याची भीती विखे पाटील यांनी व्यक्त केली. या घटनेच्या अनुषंगाने त्यांनी राज्य सरकारवरही टीकास्त्र सोडले. राज्यातील सत्ता टिकविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या अधिपत्याखालील मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराकडे जाणीवपूर्वक डोळेझाक चालवली आहे. मुंबई मनपाही देशातील सर्वाधिक भ्रष्ट महानगर पालिका असून,येथील भ्रष्ट व्यवस्थेमुळे असंख्य कर्त्या व्यक्तींचे अकाली बळी जाऊन त्यांचे प्रपंच उघड्यावर आले आहेत, तर अनेकांच्या आयुष्याची स्वप्ने ऐन तरूणाईतच उद्ध्वस्त झाली आहेत. मुंबई महापालिकेच्या नाकर्तेपणाबाबत आंधळेपणाचे सोंग घेणारा भारतीय जनता पक्ष आपली जबाबदारी टाळू शकत नाही. ते सुद्धा शिवसेनेच्या प्रत्येक पापात सारखेच भागिदार असल्याचे विखे पाटील म्हणाले. संबंधित बातम्या कमला मिल आग: टॉयलेटमधून फोन केला, भावोजी आम्हाला वाचवा! कमला मिल्स आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं! कमला मिल्स आग : सुमारे 200 जणांचा जीव वाचवणारे 'रक्षक' कमला मिल्स आग : मनसे नेत्याच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिले असते तर... कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू मुंबई अग्नितांडव : आगीची भीषणता सांगणारे फोटो आणि व्हिडीओ
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र























