युतीत शिवसेना विश्वासघात करणार नाही : आदित्य ठाकरे
शिवसेना भाजपमध्ये जे इनकमिंग सुरु आहे, त्यावर आम्ही योग्य उमेदवार पारखून घेत आहेत. युतीत शिवसेना विश्वासघात करणार नाही, अशी खात्री आदित्य ठाकरेंनी दिली.
चिपळूण : आगामी विधानसभा निवडणूक लढवायला सज्ज आहे, असं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेना-भाजप युतीमध्ये शिवसेना विश्वासघात करणार नाही, असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला.
शिवसेना विश्वासघात करणार नाही
शिवसेना-भाजपच्या युतीमध्ये तिढा निर्माण झाल्लाचं गेल्या काही दिवसांत चर्चा सुरु आहे. त्यावर युतीबाबत नेमकं ठरलं आहे. बाहेर कोण काय बोलत आहेत हे मला माहित नाही. शिवसेना-भाजपमध्ये जे इनकमिंग सुरु आहे, त्यावर आम्ही योग्य उमेदवार पारखून घेत आहोत. युतीत शिवसेना विश्वासघात करणार नाही, अशी खात्री आदित्य ठाकरेंनी दिली.
राज्यातील 288 जागांची चाचपणी करणं हे दोन्ही पक्षाचं काम आहे. कारण दोघांची ताकद तपासणे गरजेचं आहे, त्यासाठी या आढावा बैठका घेतल्या जात आहेत, असं म्हणत युती होणारच असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.
निवडणूक लढवण्यासाठी सज्ज
वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढणार आहेत, अशी चर्चा आहे. त्यावर मी निवडणूक लढवण्यास सज्ज आहे. जनतेने आदेश दिला की निवडणूकही लढेन, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
खासदार नारायण राणे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर शिवसेनेचा कोणीही पारंपरिक शत्रू उरला नाही, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. त्यामुळे शिवसेनेचा विरोध मावळला असेल तर नारायण राणेंचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला, असंच म्हणावं लागेल.