(Source: Poll of Polls)
Income Tax Raids: पक्षनिधीच्या नावाखाली 'असा' सुरू होता झोलझाल; आयकर विभागाकडून सायन, बोरिवलीतील झोपड्यांवर छापे
Income Tax Raids: पक्षनिधीच्या माध्यमातून करचोरी सुरू असल्याचा प्रकार आयकर विभागाने उघडकीस आणला आहे. मुंबईतील सायन आणि बोरिवली भागातील झोपड्यांवर आयकर विभागाने छापे मारले.
Income Tax Raids In Mumbai: दोन दिवसांपासून देशभरात आयकर विभागाची छापेमारी (Income Tax Raids) सुरू आहे. आज मुंबईतील सायन आणि बोरिवली परिसरात आयकर विभागाने छापेमारी केली. विशेष म्हणजे ही छापेमारी झोपडपट्टी भागात ही कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. झोपडपट्टीमध्ये छापा मारलेले ठिकाण हे राजकीय पक्षाचे कार्यालय आहे. हा राजकीय पक्ष नोंदणीकृत असला तरी निवडणूक आयोगाची मान्यता नाही. पक्षनिधीच्या नावाखाली करचोरीचा प्रकार आयकर विभागाने उघडकीस आणला आहे. देशभरात अशी कारवाई सुरू आहे.
आयकर विभागाकडून मागील काही दिवसांपासून छापेमारीची कारवाई सुरू आहे. आयकर विभागाने आज मुंबईतील सायन परिसरातील एका झोपडीवर छापा मारला आहे. फक्त 100 चौफूट असलेल्या झोपडीवर एका पक्षाचे नोंदणीकृत कार्यालय आहे. बँक रेकॉर्डनुसार, या पक्षाला मागील दोन वर्षात 100 कोटींची देणगी मिळाली होती. हा राजकीय पक्ष नोंदणीकृत असला तरी त्याला निवडणूक आयोगाची परवानगी नाही.
नावापुरतं अध्यक्षपद सूत्रधार अहमदाबादमध्ये
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पक्षाच्या अध्यक्षाला या व्यवहाराबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने आपणं फक्त नावापुरतं आणि 'स्टेट्स' साठी अध्यक्ष असल्याचे सांगितले. पक्ष निधी आणि इतर व्यवहार हे अहमदाबाद येथील ऑडिटरकडून केले जात असल्याचे त्याने सांगितले.
पक्षनिधीच्या नावाखाली करचोरी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या राजकीय पक्षाने जवळपास 100 कोटी रुपयांचा निधी स्वीकारला होता. या निधीसाठी प्रमाणपत्रही देण्यात आले. या प्रमाणपत्रांचा वापर आयकर सवलत मिळवण्यासाठी केला जातो. पक्षाला मिळालेल्या निधीतून 0.01 टक्के रक्कम कापली जात होती. त्यानंतर ऑडिटरने तयार केलेल्या संस्थांमध्ये हा पैसा दिला जात होता.
बोरिवलीमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. बोरिवलीतील एका लहान घरातून एका पक्षाचे कार्यालय संचलित केले जात होते. या पक्षाने विविध व्यक्ती आणि संस्थांकडून 50 कोटींचा निधी घेतला होता. त्यानंतर या पैशांचे वाटप विविध संस्थांमध्ये करण्यात आले.
2000 कोटींचा झोलझाल
देशभरात 205 ठिकाणी आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयावर छापे मारण्यात आले होते. याचा वापर करचोरीसाठी करण्यात येत होता. मुंबई आणि गुजरातमधील काही राजकीय पक्षांना मिळालेला निधी हा 2000 कोटींहून अधिक असू शकतो. अहमदाबादसह गुजरातमध्ये करचोरसाठी असे अनेक राजकीय पक्ष चालवले जात आहेत. गुजरातमध्ये 21 राजकीय पक्षांवर छापेमारी करण्यात आली होती. यासाठी मुंबईहून 120 आयकर अधिकाऱ्यांचे पथक गुजरातमध्ये पाठवण्यात आले होते.