अंबरनाथमध्ये एकाच सोसायटीत डेंग्यूचे आठ रुग्ण आढळले
अंबरनाथ नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने या परिसरात पाहणी केली, त्यावेळी सुरू असलेल्या बांधकामांवर साचलेल्या पावसाच्या पाण्यात त्यांना डेंग्यूच्या डासांच्या अळ्या सापडल्या.
ठाणे : अंबरनाथमध्ये एकाच सोसायटीत राहणाऱ्या तब्बल आठ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. डेंग्यूचे रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. त्यामुळे डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेनं मोहीम हाती घेतली आहे.
अंबरनाथच्या पूर्व भागातील मोरीवली पाडा परिसरात अनेक नवीन बांधकामं सुरू आहेत. या भागातील विश्वजीत ग्रीन्स संकुलात राहणाऱ्या आठ जणांना मागील काही दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे त्यांनी रुग्णालयात जाऊन तपासणी केली. त्यावेळी त्यांना डेंग्यू झाल्याचं निष्पन्न झालं.
सध्या या सगळ्यांवर अंबरनाथच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारानंतर अंबरनाथ नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने या परिसरात पाहणी केली, त्यावेळी सुरू असलेल्या बांधकामांवर साचलेल्या पावसाच्या पाण्यात त्यांना डेंग्यूच्या डासांच्या अळ्या सापडल्या.
अंबरनाथ नगरपालिकेकडून या सगळ्या बांधकामांना आता नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने मोहीम हाती घेतली आहे.