सावधान! ठाणे शहरात फिरताना मास्क नसेल तर 500 रुपयांचा भुर्दंड बसणार
ठाणे शहरातील नियंत्रणात आलेला कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव सप्टेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात पुन्हा वाढू लागलेला आहे.
ठाणे : गेल्या काही दिवसात ठाण्यातील कोव्हीड 19 अशा रुग्णांचा वाढता आकडा पाहून आता प्रत्येक नागरिकाने मास्क लावणे बंधनकारक असल्याचे ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आज आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे जर सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता कोणी आढळल्यास त्यावर पाचशे रुपयांचा दंड देखील आकारण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभात समित्यांचे सहाय्यक आयुक्त यांना यासंबंधी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
ठाणे शहरातील नियंत्रणात आलेला कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव सप्टेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात पुन्हा वाढू लागलेला आहे. दर दिवशी सापडणारी रुग्णसंख्या पुन्हा चारशे च्या वर गेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मधल्या काळात रुग्ण संख्या नियंत्रणात आल्याने काही नियम शिथिल करण्यात आले होते. मात्र शिथीलतेचा गैरवापर करत अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी शासकीय कार्यालय आणि खासगी कार्यालयात मास्क वापरणे देखील सोडून दिले होते. महापालिकेच्या निदर्शनास ही गोष्ट आल्यानंतर आता अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आज आयुक्तांनी घेतला आहे.
या निर्णयानुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणा-या व्यक्तींकडून 500 रूपये दंड वसूल करण्यात येणार आहे. या कारवाईसाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता निरीक्षक, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक, अतिक्रमण व कर विभागाचे बीट निरीक्षक, बीट मुकादम त्याचप्रमाणे पाणी पुरवठा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात जर कोणी नागरिक पायी चालत असताना किंवा दुचाकीवरुन फिरत असताना मास्क वापरत नसेल तर त्यावर पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे.
संबंधित बातम्या :