(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वर्ध्याच्या ऑरगॅनिक कापसापासून निर्मित खादीच्या मास्कला इंग्लंडमध्ये मागणी
कोरोनाकाळात मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारात अनेक प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. सिंथेटीक तसेच इतर मास्क उपलब्ध असले तरी या बाजारातही खादी आपले वेगळेपण दर्शवित आहे.
वर्धा : 'खादी बगावत का झेंडा..' हे वाक्य आजही वर्ध्यातील ग्रामसेवा मंडळाच्यावतीनं लिहिलेलं दिसत. स्वातंत्र्यलढ्यात खादीने बंडाचा झेंडा रोवला होता. इंग्रजांविरोधातल्या लढाईत खादी महत्वाची ठरली. आजही खादीच महत्व कायम आहेय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात मास्कची मागणी वाढली आहे. त्यामध्ये वर्ध्यातील गोपुरी येथील ग्रामसेवा मंडळाद्वारे निर्मित ऑर्गनिक कापसापासून निर्मित खादीचे मास्क इंग्लंडमध्ये पसंतीला उतरले आहे. या मास्कचे सुरूवातीला नमुने पाठवण्यात आले. त्यानंतर आता हळूहळू मास्कच्या ऑर्डरही मिळाल्या लागल्या आहेत.
कोरोनाकाळात मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारात अनेक प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. सिंथेटीक तसेच इतर मास्क उपलब्ध असले तरी या बाजारातही खादी आपले वेगळेपण दर्शवित आहे. त्यातही ऑर्गनिक कापसाचे महत्त्व वेगळे आहे. वर्ध्याच्या गोपुरी येथील ग्रामसेवा मंडळामध्ये ऑर्गनिक कापसापासून निर्मित खादीचे मास्क तयार केले जात आहेत. हे मास्क इंग्लंडला पाठवण्यात येत आहेत. इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले आणि ग्रामसेवा मंडळाशी जुळलेले किशोर शहा व त्यांच्या मित्र परिवाराने या मास्कमध्ये गोडी दाखविली.
कोरोनाच्या काळात मास्कची वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी हे मास्क मागवले. त्याकरिता त्यांनी तेथूनच मास्कचे डिझाईन, लांबी, रुंदी, शिलाईची पद्धत सांगितली. थ्री लेअर मास्कचे डिझाईन तंतोतंत असावे, त्यांना पाहिजे त्या पद्धतीने ते शिवण्याकरता येथे प्रयत्न सुरू झाले. अखेर त्यात यश आले. जवळपास महिनाभर मेहनत करत बारीक काम केल्यानंतर आवश्यक डिझाईन, तंतोतंतपणा असलेले मास्क तयार झाले. सुरुवातीला काही मास्क इंग्लंडला पाठवण्यात आले. याकरिता नॉन बिटी ऑर्गनिक कापसापासून तयार खादीचा वापर केल्या जात आहे. एक हजार मास्कची ऑर्डर मिळाली असल्याचे ग्रामसेवा मंडळाच्या अध्यक्ष करुणा फुटाणे यांनी सांगितले.
आचार्य विनोबा भावे यांनी 1934 मध्ये ग्रामसेवा मंडळाची स्थापना केली. या भागातील लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न, त्यांच्या श्रमाला, कामाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सुरू झालेल्या प्रयत्नांतून हे मंडळ आकारास आले. विनोबा भावे यांनी कताईचे शास्त्र आणि अर्थशास्त्र दोन्ही वर आपल्या सहकाऱ्यांसोबत दीर्घ काळ स्वतः कापूस पिंजण्यापासून कताईचे सर्व टप्पे प्रयोगाद्वारे सिद्ध केले. त्यातून मिळणाऱ्या मजुरीतून उदरनिर्वाह शक्य आहे किंवा नाही हेही तपासले. त्यासाठी प्रयोगाच्या कालावधीत अनेक आठवडे त्यांना एक वेळ उपाशीदेखील राहावे लागले होते.
ग्रामसेवा मंडळाच्या वतीने ऑर्गनिक कापूस शेतकऱ्यांकडून घेतल्या जातो. येथे कापसापासून कापडापर्यंतची प्रक्रिया केली जाते. यातून अनेकांना रोजगारही उपलब्ध होत आहे. हा मास्क थ्री लेअर आहे. श्वसनालाही चांगला आहे. गरम पाण्यात धुवूनदेखील त्याचा वापर केल्या जाऊ शकतो. त्याचे निर्जंतुकीकरणही करता येते. घामाचाही त्रास होत नसल्याचे सांगितले जाते.
सुरुवातीला हे मास्क इंग्लंडमध्येच तयार करण्याचा प्रयत्न झाला. त्याकरीता तेथे मागणीप्रमाणे कापड पाठवण्यात आला. तेथे मास्क तयार करून बघितले गेले. नंतर ग्रामसेवा मंडळाच्या वतीने येथे मास्क तयार केल्यास स्थानिकांना रोजगार मिळेल, याकरीता येथेच मास्क तयार करून मागवावे, असा आग्रह केला. सर्जिकल मास्क वगळता इतर मास्कला निर्यातीला परवानगी मिळाल्यानंतर येथे मास्क शिवणे सुरू झाल्याने स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होऊ लागला.
इंग्लंडमधून पाठवलेल्या डिझाईननुसार तंतोतंत आकाराचाच मास्क शिवावा लागतो. तसेच त्याकरीता बारीक काम करावे लागते. एक मास्क शिवायला 20 ते 30 मिनिटांचा कालावधी लागत असल्याचे मास्क शिवणारे गणेश खांडसकर यांनी सांगितले. सर्वत्र रासायनिक शेती, उत्पादनांचा वापर वाढत असताना आजही ऑर्गनिक उत्पादनांचे महत्त्व कायम आहे. अनेक जण ऑर्गनिकची विशेष मागणी नोंदवतात. अशा स्थितीत ऑर्गनिक कापसाच्या खादीपासून निर्मित मास्कची मागणी वाढल्यास स्थानिक शेतकरी, मजुरांनाही निश्चितच त्याचा फायदा होईल आणि रोजगारही वाढेल. गरज आहे त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची.