Kurla BEST Bus Accident: दुर्घटनेसाठी मी एकटा जबाबदार नाही; कुर्ला बस अपघात चालक संजय मोरेचा जामीन अर्जात दावा, पोलिसांचा कडाडून विरोध
Kurla BEST Bus Accident: बेस्ट बसचा चालक संजय मोरे यानं गेल्या आठवड्यात जामिनाच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी त्याच्या वतीनं आपण निर्दोष असून बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
Kurla BEST Bus Accident Update: कुर्ल्यातील बस अपघातामुळे (Kurla Bus Accident) अख्खी मुंबई (Mumbai Bus Accident) हादरलेली. एक भरधाव बस कुर्ल्यातील रहदारीच्या रस्त्यावर घुसली आणि तिनं अनेकांना चिरडलं. या प्रकरणी बेस्ट बसचा चालक संजय मोरेला पोलिसांनी तात्काळ अटक केली. चालक संजय मोरे यानं जामिनाच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी कुर्ला बस अपघात चालक संजय मोरेमुळेच झाला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, भीषण अपघातात प्रमुख आरोपी आणि बस चालक संजय मोरे हा घटनेच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत नव्हता. तसेच, बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नव्हता, हे तपासातून समोर आलं आहे.
बेस्ट बसचा चालक संजय मोरे यानं गेल्या आठवड्यात जामिनाच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी त्याच्या वतीनं आपण निर्दोष असून बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश सचिन पवार यांच्यासमोर मोरे याच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी पार पडली. पोलिसांच्या वतीनं अतिरिक्त सरकारी वकील प्रभाकर तरंगे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून मोरे याला जामीन देण्यास विरोध केला.
दुर्घटनेसाठी मला एकट्याला जबाबदार धरता येणार नाही, आरोपी चालकाचा दावा
आपल्याला 1989 पासून बस चालविण्याचा अनुभव आहे. अपघातावेळी विद्युत बसमध्ये यांत्रिक बिघाड झाला होता आणि त्यामुळेच दुर्दैवी अपघात झाला. म्हणून या अपघातासाठी आपल्याला जबाबदार धरता येणार नाही. उलट या अपघाताला जबाबदार असलेल्या प्रमुख आरोपींना वाचवण्यासाठी आपला बळी दिला जातोय, असा दावा जामीन अर्जात आरोपी बेस्ट चालक संजय मोरेनं केला आहे. चालक मोरेचे वकील समाधान सुलाने यांच्यामार्फत जामीन अर्ज कोर्टात सादर करण्यात आला.
या प्रकरणात कोणत्याही बस कंत्राटदाराला अटक करण्यात आली नाही, आरोपीही करण्यात आलेलं नाही. आपल्याला बेस्टमधून वाहन चालवण्याचं प्रशिक्षण दिलेलं आणि दिंडोशी बस आगारात विद्युत बस चालवण्यास सांगितलेलं. त्यानंतर, आपल्याला कुर्ला इथे बस चालवण्यास परवानगी देण्यात आली, त्यामुळे या दुर्घटनेसाठी मला एकट्याला जबाबदार धरता येणार नाही, असा पुनरूच्चार संजय मोरनं आपल्या जामीन अर्जा केलाय.
अपघातात 7 निष्पापांचा बळी
मुंबईतील कुर्ला येथे झालेल्या बस अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. तर, तब्बल 42 हून अधिक जखमी झाले होते. अनियंत्रित बसनं आधी ऑटोला धडक दिली आणि नंतर एकामागून एक वाहनांना चिरडंत बस पुढे गेली. अनेक पादचारी आणि फेरीवाल्यांनाही बसनं उडवलं होतं.