एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत कुणाचा महापौर बसणार? सत्तेची समीकरणं
मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या 84 आणि भाजपच्या 82 जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे स्पष्ट बहुमतापासून दोन्हीही पक्ष दूर आहेत. महापौर आमचाच असेल, असा दावा दोन्हीही पक्षांनी केला आहे.
मुंबईत काँग्रेसची भूमिक महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे 227 नगरसेवक असलेल्या मुंबई महापालिकेत सत्ता स्थापण्यासाठीची मॅजिक फिगर 114 कोण गाठणार, हे पाहावं लागेल.
काँग्रेसची निर्णायक भूमिका
शिवसेनेला 84, भाजपला 82, काँग्रेसला 31, राष्ट्रवादी काँग्रेसला 9, मनसेला 7 आणि इतरांना 14 जागा मिळाल्या आहेत. या गणितात काँग्रेसला साहजिकच महत्त्व आहे. काँग्रेसने मदत करावी म्हणून शिवसेनेचे प्रयत्न सुरू असले तरी काँग्रेसची द्विधा मनस्थिती असेल. कारण भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेला मदत करावी, अशी परिस्थिती असली तरी त्याचे देशभर अन्यत्र पडसाद उमटतील आणि अल्पसंख्यांकांच्या मतांवर परिणाम होण्याची भीती आहे.
यामुळेच काँग्रेसच्या पाठिंब्यासाठी शिवसेनेने त्यादृष्टीने पावलं टाकण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. मुंबईचा महापौर आणि मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच राहील, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अगोदरच स्पष्ट केलंय. त्यामुळे शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातील आणि त्यानंतर राज्य सरकारच्या पाठिंब्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असाही गर्भित इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि अपक्षांसह इतरांशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. काँग्रेसव्यतिरिक्त अन्य पक्षांचा पाठिंबा मिळाला, तरी भाजपचे संख्याबळ 100 वर जाईल. सर्वच अपक्ष आणि इतर पक्ष भाजपच्या गळाला लागणं कठीण असल्यानं हे गणित वाटतं तेवढं सोपं नाही. उलट शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा दिला किंवा बाहेर राहून मदत केली, तरी काँग्रेसच्या 31 जागा आणि काही अपक्षांची मदत मिळवून शिवसेनेचा महापौर आरामात निवडून येऊ शकतो. त्यामुळे महापौर कोणाचा बसणार, हे सर्वस्वी काँग्रेसच्या भूमिकेवर अवलंबून राहील.
'सपा'चा शिवसेनेला पाठिंबा?
समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेत या पक्षाने शिवसेनेला या अगोदर मदत केली आहे. यामुळेच सपाची मदत होऊ शकते, असं शिवसेनेचं गणित आहे.
... तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल?
शिवसेनेने कायमच आघाडी सरकारविरोधात भूमिका घेतली होती. निवडणुकीआधीही शिवसेना-काँग्रेस यांच्यात सेटलमेंट असल्याचा आरोप भाजपने केला होता.
त्यामुळे काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेने सत्ता मिळवली तर भाजपकडून काँग्रेस-शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र भाजपने अन्य पक्षीयांच्या मदतीने आपला महापौर बसवला, तर मुंबईत शिवसेनेचा महापौर नाही, हे शिवसेनेला कदापिही सहन होणार नाही. त्यावेळी ते राज्य सरकारचाही पाठिंबा काढण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असं बोललं जातं.
राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी भाजपने शिवसेनेशी तडजोड करुन महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपद वाटून घेण्याबाबत चर्चा होऊ शकते, अशी भाजपमधील सुत्रांची माहिती आहे. मात्र शिवसेनेकडून महापालिकेतील सत्ता हिसकावून घेण्याची संधी चालून आली असताना ती दवडायची का, असाही प्रश्न आहे.
शिवसेनेने भाजपला सन्मानाची वागणूक दिली आणि महापौरपद आणि स्थायी समिती अध्यक्षपदात समान भागीदारी दिली, तरच तोडगा निघू शकणार आहे. मात्र सध्या भाजप आणि शिवसेना स्वबळाचाच संघर्ष अधिक तीव्र करण्याच्या भूमिकेत आहेत. शिवसेना आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार या दोघांनीही महापौरपदावर दावा केला आहे. या दोन्ही पक्षांनी 114 चा आकडा गाठण्यासाठी सर्व पक्षांशी आणि अपक्षांशी चर्चाही सुरू केली आहे.
संख्याबळाचं गणित मांडून भाजपचा महापौर बसवून दाखवून शिवसेनेला आव्हान देण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. ते झाल्यावरच शिवसेना चर्चेला तयार होईल, अशी खेळी करण्याचीही भाजपची रणनीती आहे.
मनसे शिवसेनेला पाठिंबा देणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीआधी शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला होता. पण उद्धव ठाकरेंनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नव्हता. पण आता मनसेची भूमिका निर्णायक ठरु शकते. त्यामुळे शिवसेना मनसेची मदत मागणार का आणि मनसे त्याला प्रतिसाद देणार का, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
तर भाजपच्या 88 जागा मुंबईत निवडून आल्या असत्या..
मुंबईत 'या' दिग्गजांना मतदारांचा दे धक्का
ईश्वर चिठ्ठी भाजपच्या बाजूने, मुंबईत एक जागा वाढली
मुंबई आणि ठाणे वगळता सर्वच महापालिकांमध्ये भाजप नंबर वन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement