Mansukh Hiren | मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी गृहमंत्र्यांची पोलिस अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली आहे.
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी स्कॉर्पिओ गाडी सापडली होती, त्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा काल (शुक्रवार) संशयास्पद मृत्यू झाला. ज्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सायंकाळी 6 वाजता शासकीय निवासस्थान ज्ञानेश्वरीवर महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्यांसोबत आढावा बैठक घेतली.
या बैठकीमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाराष्ट्र पोलिस महासंचालक हेमंत नगराळे, मुंबई पोलीस आयुक्त परंबिर सिंह, ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त आणि ज्या परिसरात मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला त्या हद्दीतील मुंब्रा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उपस्थित होते.
मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण त्यांना एनआयएकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडे सोपवला आहे.
मनसुख हिरेन यांच्या शरीरावर मोठ्या जखमा नाहीत, शवविच्छेदन अहवालात समोर
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्यात आली होती. त्या दिवसापासून आजपर्यंत पोलिसांनी काय तपास केला? या तपासात काय निष्पन्न झालं? या सर्वांचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप लावले. तसेच राज्य सरकारचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलिस या प्रकरणाचा प्रामाणिक तपास करू शकणार नाही, अशी शंका व्यक्त करत हा तपास एनआयएकडे देण्यात यावा अशी मागणी सुद्धा केली.
याला उत्तर देत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सक्षम असल्याचे सांगत केंद्रीय तपास यंत्रणांकडे याचा तपास देण्याची गरज नसल्याचं सांगितलं. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणाचा तपास कार्यरत असलेल्या न्यायाधीशांकडून करण्याची मागणी केली. 2008 साली सचिन वाझे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. ख्वाजा युनूस एन्काऊंटर प्रकरणांमध्ये त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. मात्र, शिवसेनेची सत्ता येताच ते पोलिस दलात कसे रुजू होतात? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाला आता राजकीय वळण लागत असल्याचे पाहुन गृहमंत्र्यांनी ही आढावा बैठक घेतली असल्याचे बोलले जात आहे.