Mansukh Hiren PM Report | मनसुख हिरेन यांच्या शरीरावर मोठ्या जखमा नाहीत, शवविच्छेदन अहवालात समोर
मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन यांचा अहवाल एबीपी माझाच्या हाती लागला आहे, मृतदेह सापडल्याच्या 12 ते 24 तास आधी त्यांचा मृत्यू झाला असून शरीरावर कोणत्याही मोठ्या जखमा नाहीत, असं अहवालात म्हटलं आहे. मात्र मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
मुंबई : मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल एबीपी माझाच्या हाती लागला आहे. हिरेन मृतदेह सापडल्याच्या 12 ते 24 तास आधी त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या शरीरावर कोणत्याही मोठ्या जखमा नाहीत. परंतु अहवालात मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसंच कोणत्याही घातपाताचा उल्लेख या शवविच्छेदन अहवालात नाही.
त्यांच्या शरीराचे कोणत्याही अवयवांना दुखापत झालेली नाही, असंही शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे. मृत्यूचं नेमकं कारण हे केमिकल अॅनासिसिसनंतर समोर येणार आहे. त्यांचा मृत्यू बुडून झाला की हा घातपात हे केमिकल अॅनासिसिसमधून स्पष्ट होईल. मनसुख हिरेन यांच्या चेहऱ्यावरील जखमांवरुन काही प्रश्न उपस्थित होत आहेत. शवविच्छेदन अहवालाता मृत्यूचं प्राथमिक कारण समोर येईल अशी अपेक्षा होती. परंतु अहवालात मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान शवविच्छेदन अहवालाशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मनसुख हिरेन यांच्या कुटुंबांने घेतली होती. त्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे पीएम रिपोर्ट घेऊन त्यांच्या घरी पोहोचले.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या अहवालावर हिरेन यांचे कुटूंबीय समाधानी नसल्याचे यावेळी जैन समाजाच्या वतीने सांगण्यात आलं. मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केलेली नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप यावेळी हिरेन यांच्या नातेवाईकांनी केला. तसेच जोपर्यंत मृत्यूचे कारण समजणार नाही तोपर्यंत मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नसल्याचं यावेळी नातेवाईक आणि मित्रांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
मनसुख हिरेन प्रकरणात सकाळपासून काय काय झालं?
- नागपाड्यात नव्या बीट चौकीच्या उद्घाटनासाठी आलेल्या पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं
- मनसेने सचिन वाझे यांच्या पोलीस दलातील नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केला. सचिन वाझे यांनी 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता.
- ख्वाजा युनूस प्रकरणाचा निकाल अजून लागला नाही मात्र शिवसेनेची सत्ता येताच सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत रुजू का केलं जातं?
- सिटिंग जजकडून हा तपास करण्यात यावा. सर्व महत्त्वाचे तपास वाझे यांच्याकडेच का दिले जातात? असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला
- मनसुख हिरेन यांनी 3 मार्चला पोलिस आयुक्त, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्र हाती लागलं आहे. ज्यात हिरेन यांनी पोलीस दलातील वेगवेगळी डिपार्टमेंट्स मानसिक छळ झाल्याचा आरोप केलाय. शिवाय माध्यमांनीही आपली प्रतिमा मलीन केल्याने ते नाराज होते. याची रितसर तक्रार त्यांनी केली होती
- संजय राऊत यांनीही मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे असं म्हटलं आहे. मात्र त्यासाठी केंद्रीय संस्थांची गरज नाही असं स्पष्ट केलं आहे. "जर काही प्रश्न उपस्थित होत असतील तपास व्हायला हवा. विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न योग्य असतील, त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर तपास व्हायला हवा. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. आत्महत्या की हत्या ही लोकांच्या मनात शंका आहे. या शंकेटं निरसण होणं गरजेचं आहे. मृत्यूचं भांडवल होऊ नये. या घटनेचं सत्य गृहखातं जेवढं लवकर बाहेर आणेल , हे या सरकारच्या प्रतिमेसाठी चांगलं आहे.
- अधिवेशन सुरु असताना एका महत्वाच्या साक्षीदाराचा मृत्यू होणं धक्कादायक आहे. तपास पूर्ण होण्याआधीच विरोधकांनी सरकारला आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नाही. हा तपास एएनआय कडे देण्याची गरज नाही मुंबईचे पोलीस सक्षम आहेत मी एखाद्या अधिकाऱ्याच नाव घेणार नाही ”
- डीसीपी अविनाश अंबुरे मनसुख हिरेन यांच्या घरी गेले. घरी जाऊन त्यांनी पत्नी आणि कुटुंबातील लोकांशी बातचीत केली. तसंच सोसायटीमधल्या लोकांशी बातचीत केली. मृतदेह आणल्यानंतर कुठे ठेवायचा यावच चर्चा झाल्याचं कळतं.
- पीएम रिपोर्ट मिळाल्याशिवाय, चित्रीकरण मिळाल्या शिवाय, मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा हिरण यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. हिरेन यांचा एक भाऊ डॉक्टर आहे. तो सगळे रिपोर्ट पाहिल मगच मृतदेह ताब्यात घेणार.
- मनसुख हिरेन यांच्या मृतदेहसोबत त्यांचा मोबाईल सापडलेला नाही. त्यांचा मोबाईल शोधण्याचं काम पोलीस करत आहेत. मनसुख यांनी कोणाकोणाला कॉल केला होता, याचा तपास ते करत आहे. मनसुख यांचा सीडीआर काढला जाणार आहे. पोलिसांनी याच्या तपासासाठी 3 पथकं बनवली आहे. संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फूटज तपासलं जात आहे.
- ठाणे क्राईम ब्रान्चची हिरेन यांच्या घरी दाखल, युनिट 1 ची टीम, वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह इथे दाखल
- मंगलप्रभात लोढा यांनी मनसुख हिरेन यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची विचारपूस केली. त्यानंतर आमदार संजय केळकरही हिरेन यांच्या घरी पोहोचले.
- ठाणे पोलिसांना शवविच्छेदन अहवालाचा प्राथमिक अहवाल मिळाला आहे. प्राथमिक पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण स्पष्ट नाही. याची सखोल चौकशी करण्यासाठी व्हिसेरा आणि इतर नमुने फॉरेन्सिक लॉबमध्ये पाठवण्यात आले आहेत.