Raj Thackeray यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी
Raj Thackeray Surgery : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आज (20 जून) हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून राज यांची प्रकृती स्थिर आहे.
Raj Thackeray Surgery : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आज (20 जून) हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईतील लीलावती रुग्णालयात राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. विनोद अग्रवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया केली. राज यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर डॉ. जलील परकार यांची टीम दुपारी चार वाजता या संदर्भात सविस्तर माहिती देणार आहे. पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना साधारण दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.
शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच्या चाचण्या करण्यासाठी राज ठाकरे यांना शनिवारी (18 जून) मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. अखेर आज त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
राज ठाकरेंसाठी प्रार्थना, होम हवन करणाऱ्यांचे आभार : बाळा नांदगावकर
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरील हिप बोनची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. जवळपास दीड तास ही शस्त्रक्रिया चालली. डॉ. विनोद अग्रवाल आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया पार पाडली. मात्र अजून काही दिवस राज ठाकरे यांना आराम करावा लागणार आहे. आम्ही सर्वांचे आभारी आहोत ज्यांनी ज्यांनी राज ठाकरेंसाठी दुआ, प्रार्थना, होम हवन, अभिषेक केला, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
कोरोनाचे डेड सेल्स आढळल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलली
याआधी देखील राज ठाकरे शस्त्रक्रियेसाठी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल झाले होते. पण तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये कोरोनाचे डेड सेल्स आढळून आले होते. यामुळे त्यांना अॅनास्थेशिया म्हणजे भूलीचं इंजेक्शन देण्यात येऊ शकत नव्हतं. त्यामुळे त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.
टेनिस खेळताना दुखापत
मध्यंतरीच्या काळात टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. हीच दुखापत पुन्हा एकदा बळावली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार आज लिलावती रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली.
अयोध्या दौरा स्थगित
राज ठाकरे मे महिन्यात पुणे दौऱ्यावर होते. हे दुखणं वाढल्यामुळे त्यांनी पुणे दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतले. यानंतर राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केल्याचं जाहीर केलं. येत्या 5 जून रोजी राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह अयोध्या दौऱ्याला जाणार होते. त्यासाठी जय्यत तयारीही करण्यात आली. परंतु पायाचं दुखणं अधिकच वाढल्याने डॉक्टरांनी शस्त्रकियेचा सल्ला दिला. परिणामी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं.
हिप बोन म्हणजे नेमकं काय?
हिप बोन म्हणजे कमरेच्या हाडांना होणारा त्रास. विशेष म्हणजे हा त्रास आपल्याला रोज जाणवत नाही तर, अचानक शरीराच्या एका विशिष्ट भागात तणाव जाणवतो. हिप बोनचा त्रास सांध्यांमध्ये जास्त जाणवतो. अधिकतर हा त्रास स्नायू आणि हाडांवर जास्त दबाव आल्यामुळे होतो.
हिप बोनचा त्रास कशामुळे होतो?
ठराविक वेळेनंतर अधिक तास काम करणे.
एकाच स्थितीत बराच वेळ राहणे.
बदलती जीवनशैली हे एक प्रमुख कारण आहे.
कॅल्शियमची कमतरता.