Kalyan News : हृदयद्रावक! बिहारहून कामाच्या शोधात आलेल्या तरुणावर काळाचा घाला, रेल्वेतून पडून जीव गमावला
Kalyan News : बिहारहून काम शोधण्यासाठी आला आणि रेल्वेतून पडून त्यानं जीव गमावला, कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
Kalyan News : देशभरातून अनेकजण नोकरी, व्यावसाय करण्यासाठी मुंबईत (Mumbai News) येतात. आपलं पोट भरण्यासाठी मुंबईत येऊन छोटा-मोठा व्यावसाय करतात किंवा एखादं काम पाहतात. असाच एक तरुण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी बिहारहून (Bihar) मुंबईला आला होता. पण काळानं घाला घातला आणि त्यानं जीव गमावला. एक्सप्रेसमधून रेल्वे रुळावर पडून नोकरीच्या शोधात मुंबईत आलेल्या तरुणानं आपला जीव गमावला आहे.
राजेंद्र कोंडा हा मुळचा बिहारचा. कामाच्या शोधात हा तरुण आपल्या नातेवाईकांसोबत मुंबईत आला होता. बागलपूर एक्सप्रेसनं आलेलं हे कुटुंब रेल्वेत गर्दी असल्यानं दरवाज्याजवळ उभं होतं. ही गाडी कल्याण ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान आसी असता राजेंद्र कोंडा याचा तोल जाऊन रेल्वेतून खाली पडला. नातेवाईकांना घडलेला प्रकार लक्षात आला. त्यांनी स्थानकात उतरुन पुन्हा लोकल ट्रेननं कल्याण रेल्वे स्थानक गाठलं. कल्याण रेल्वे स्थानकात नातेवाईकांनी राजेंद्रचा शोध घेतला. मात्र त्यांना राजेंद्र कुठेच सापडला नाही. अखेर कुटुंबीयांनी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाणं गाठलं आणि राजेंद्र सापडत नसल्याबाबतची तक्रार नोंदवली.
रेल्वे पोलिसांनी तात्काळ तक्रार दाखल करुन घेत राजेंद्रचा शोध सुरु केला. कल्याण ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान, पाचव्या आणि सहाव्या रेल्वे लाईनच्या खालील नाल्याच्या वाहत्या पाण्याच्या बाजूकडील कठड्याजवळ पोलिसांना राजेंद्रचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांना बोलावलं. नातेवाईकांना मृतदेह दाखवल्यानंतर त्यांनी हा मृतदेह राजेंद्रचाच असल्याचं सांगितलं. रेल्वे पोलिसांनी आवश्यक बाबींची पूर्तता करुन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. डोंबिवली जीआरपी पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.
दरम्यान, दरवर्षी लाखो तरुण देशभरातून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत येतात. राजेंद्र त्यापैकींच एक. पण काळानं घाला घातला आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी गावाहून मुंबईच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या राजेंद्रच्या स्वप्नांना कायमचाच पूर्णविराम लागला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं भोवलं; गुन्हा दाखल