Money laundering Case : कोरोनाबाधित अभिनेता सचिन जोशीला तूर्तास दिलासा नाहीच, आर्थररोड जेलच्या विलगीकरण कक्षातच उपचार घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
कोरोनाची लागण झालेला अभिनेता आणि व्यावसायिक सचिन जोशीला तूर्तास दिलासा नाही. जामीनाची मागणी फेटाळत आर्थररोड जेलच्या विलगीकरण कक्षातच उपचार घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश.
मुंबई : अभिनेता आणि व्यावसायिक सचिन जोशीनं सुटकेसाठी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्थररोड कारागृहात कोरोनाची लागण झाल्यानं खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका त्यानं दाखल केली आहे. मात्र त्याची ही मागणी फेटाळून लावत त्याला कारागृहातील विलगीकरणातच उपचार घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालय (ईडी) कडून अटक केल्यानंतर जामीन मिळूनही सचिन जोशी अद्याप कारागृहातच आहे. कारण हा जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
ओमकार ग्रुप प्रमोटर्स आणि सचिन जोशीकडून करण्यात आलेल्या हजारो कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी सचिन जोशीला ईडीकडून समन्स बजावण्यात आले होतं. मात्र समन्स बजावल्यानंतही सचिन जोशी ईडी कार्यालयात हजर झाला नव्हता. यानंतर त्याला चौकशीसाठी दक्षिण मुंबईतील कार्यालयात आणून अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी सचिन जोशीला वैद्यकीय कारणास्तव सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, त्या आदेशाविरोधात ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानं त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही त्यामुळे सचिन जोशी अद्याप आर्थर रोड कारागृहातच आहे.
सचिन जोशीला 21 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्यानं त्याने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून आपल्याला कोरोनावरील उपचारासाठी खाजगी रुग्णालायात उपचार घेण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी त्याने याचिकेतून केली आहे. त्यावर सोमवारी न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर व्हीसीमार्फत सुनावणी पार पडली. त्याच्या मागणीला ईडीच्यावतीने बाजू मांडताना ॲड. हितेन वेणेगावकर यांनी विरोध केला. त्याची दखल घेत हायकोर्टानं सचिन जोशीला तूर्तास कोणताही दिलासा न देता त्याला आर्थर रोड कारागृहातील विलगीकरण कक्षातच उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत.