Hanuman Chalisa Row : चला अयोध्या! 'या' तारखेला राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर, मुंबईत मनसेकडून बॅनरबाजी
Hanuman Chalisa Row : चला अयोध्या! 5 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर, मुंबईत कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी
Hanuman Chalisa Row : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सीएसएमटी स्टेशनसमोर 'चला अयोध्या' असे पोस्टर्स मनसेकडून लावत साथ देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. काल महाराष्ट्र दिन होता, काल औरंगाबादमधील सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा भोंग्यांबाबत आपली भूमीका तीव्रच असल्याचं स्पष्ट केलं. औरंगाबादमधील सभेच्या दुसऱ्या दिवशी मनसैनिकांनी आता अयोध्या दौऱ्याची तयारीही सुरू केली आहे. दरम्यान, कालच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलताना पुन्हा एकदा भोंग्याबाबतच्या अल्टीमेटमची ठाकरे सरकारला आठवण करुन दिली आहे. लाउडस्पीकर मशिदींवर लावून तुम्ही गोंगाट करणार असाल, तर त्या मशिदींच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा पठण करू, मोठ्यानं वाचू, असा इशाराही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (CSMT) स्टेशनसमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात बॅनरबाजी करण्यात आली आहे. जूनमध्ये राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पोस्टरमधून जनतेला राज ठाकरेंना पाठिंबा देण्याचं आवाहन मनसैनिकांकडून करण्यात आलं आहे. "जय श्रीराम... धर्मांध नाही, मी धर्माभिमानी... चला अयोध्या! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा. ऐतिहासिक दिवस 5 जून 2022." , असा मजकूर आहे.
औरंगाबादच्या सभेत काय म्हणाले राज ठाकरे?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते की, ''मला कुठेही महाराष्ट्रात दंगली घडवायच्या नाहीत. तशी माझी इच्छा देखील नाही. मुस्लिम समाजानं देखील ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे.'' पुढे बोलताना ते म्हणाले होते की, "रस्त्यावर येऊन तुम्ही नमाज पडता, कोणी अधिकार दिले तुम्हाला'', असं राज ठाकरे म्हणाले. माझी शासनाला विनंती आहे, आज तारीख एक आहे. उद्या तारीख दोन. तीन तारखेला ईद आहे. त्यांच्या सणात मला मध्ये यायचं नाही, मात्र 4 तारखेपासून ऐकणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. पुढे बोलताना 4 तारखेनंतर जिथे जिथे लाउडस्पीकरवरून अजाण होणार, तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत.
राज ठाकरे पुढे म्हणाले होते की, उत्तर प्रदेशात जर लाउडस्पीकर उतरवले जाऊ शकतात, तर महाराष्ट्रात का उतरवले जाऊ शकत नाही? सर्व लाउडस्पीकर अनधिकृत आहेत. सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे, स्थानिक पोलीस ठाण्याला माहिती दिल्याशिवाय तुम्ही लाउडस्पीकर लावू शकत नाही. त्याची परवानगी घ्यावी लागते. किती मशिदींकडे परवानगी आहे. कोणाकडेच परवानगी नाही. इथे संभाजीनगरमध्ये 600 मशिदी आहेत. हे संपूर्ण देशात असून देशभरातील लाउडस्पीकर खाली आले पाहिजे. प्रत्येक वेळी आम्हीच का भोगायचं. आम्हाला सभा घ्यायचे असल्यास लगेच सांगतात, इथे शांतता क्षेत्र आहे, इथे शाळा आहे. रात्री कुठे शाळा सुरू असते?, असा सवालही राज ठाकरेंनी विचारला होता.