Ganesh Visarjan : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...; मुंबईत वाजत...गाजत...बाप्पाला भावपूर्ण निरोप
Mumbai Ganesh Visarjan : अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने आज दहा दिवसांच्या बाप्पांना निरोप दिला जात आहे. चौपाट्यांवर गणेशभक्तांची गर्दी उसळली आहे.
मुंबई : मागील दहा दिवसांपासून घरोघरी, सार्वजनिक मंडळांच्या मंडपात विराजमान झालेल्या गणपती बाप्पाला (Ganpati Bappa Morya) मुंबईत वाजत, गाजत निरोप (Ganesh Visarjan) दिला जात आहे. मुंबईतील चौपाट्यांवर गणेशभक्तांची गर्दी उसळली आहे. तर, लालबाग-परळ परिसरात गणेश गल्लीतील मुंबईचा राजा (Mumbaicha Raja), लालबागचा राजासह (Lalbaugcha Raja) इतर गणपतींना याची देही याची डोळा पाहण्यासाठी लोकांचीही गर्दी उसळली आहे. विसर्जनाच्या दिवशी वरुण राजानेदेखील दमदार हजेरी लावली.
मागील दहा दिवस भक्तांकडून पाहुणचार घेतल्यानंतर बाप्पा आज आपल्या घरी मार्गस्थ होत आहेत. बाप्पाला निरोप देताना गणेशभक्त भावूक झाल्याचे चित्र दिसून आले. अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने आज दहा दिवसांच्या बाप्पांना निरोप दिला जात आहे. मुंबईतील चौपाट्यांकडे जाणाऱ्या मार्गांवर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...या घोषणांचा जयघोष सुरू होता. बाप्पाच्या मनमोहक मूर्ती पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी उसळली होती. मुंबईत गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका, मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. गिरगाव, दादर, जुहू, अक्सा, आदी चौपाट्यांवर गणेश विसर्जन सुरू आहे. दुपारनंतर समुद्रकिनारी विसर्जनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली. या समुद्रकिनारी घरगुती त्याचबरोबर मोठ्या मंडळाच्या बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी लगबग सुरू आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव असणारे हे भक्तिमय वातावरण पाहण्यासाठी मुंबई आणि त्याचबरोबर इतर शहरातून भाविक ह्या ठिकाणी जमले आहेत.
वरुण राजाची हजेरी
मुंबईसह राज्यभरात (Mumbai Rain) एकीकडे गणेश विसर्जनासाठी (Ganapati Visarjan) धामधूम सुरु असताना, दुसरीकडे वरुणराजा तुफान बरसला. मुंबईत दुपारी साडेतीनच्या सुमारास ढग दाटून येऊन तुफान पाऊस कोसळला. विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अंधेरी, गोरेगाव, दादरसह गिरगाव चौपाटी (Girgaon Chowpatty) परिसरात पावसाचा जोर पाहायला मिळाला. याआधी हवामान विभागानेही पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला होता.
मुंबईत भर दुपारी अंधार पसरला. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट पाहायला मिळाला. या भर पावसातही अनेक गणेश मंडळांनी आपल्या मिरवणुका चालूच ठेवल्या. मुंबईच्या रस्त्यांवर कार्यकर्त्यांची गर्दी आणि कोसळणारा पाऊस असं चित्र होतं.
मुंबई पोलिसांची चोख व्यवस्था
गणेश विसर्जनाला (Ganesh Visarjan) कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय, मुंबईत होमगार्डस, विविध स्वयंसेवी संस्था, पोलीस मित्रांची मदतदेखील होत आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनाला (Lalbaugcha Raja Visarjan) यंदाही मोठी गर्दी उसळली आहे. त्यासाठीदेखील मुंबई पोलिसांकडून लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेची तयारी
मुंबई महापालिकेने (BMC) यंदाही जय्यत तयारी केली आहे. उद्या, गणेश विसर्जनासाठी (Ganesh Visarjan 2023) मुंबई महापालिकेचे 10 हजार कर्मचारी झटत आहेत. गणेश भक्तांच्या सोयीसाठी 71 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्याशिवाय, घरगुती आणि सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी 198 कृत्रिम तलावही तयार करण्यात आले आहेत. घरगुती बाप्पांचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येत आहे. अनेकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाच्या विसर्जनाला प्राधान्य दिले आहे.