Abhishek Ghosalkar : मुंबईत गोळ्यांचा थरकाप सुरुच; ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळ्या झाडून स्वत:लाही गोळ्या घालून संपवलं
अभिषेक घोसाळकर यांना तीन गोळ्या लागल्या असून त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. दहिसरमध्ये ही थरकाप उडणवारी घटना घडली.
मुंबई : मुंबईत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात गोळीबार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार झाला आहे. पैशाच्या वादातून मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केला आणि त्याने स्वतःलाही कार्यालयात गोळी घालून संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अभिषेक घोसाळकर यांना तीन गोळ्या लागल्या असून त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. दहिसरमध्ये ही थरकाप उडणवारी घटना घडली. अभिषेक घोसाळकर यांना करूणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचणार आहेत.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक घोसाळकर गोळीबार होण्यापूर्वी एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यानंतर हा गोळीबार झाल्याचे समजते. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिस नावाच्या स्वयंघोषित नेत्याने स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली. त्याने हा गोळीबार त्याच्याच कार्यालयात केला. मॉरिस दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती आहे. त्याला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जायचे. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिसचे काम होते.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
दरम्यान, अभिषेक घोसाळकरवर झालेल्या गोळीबारानंतर धक्कादायक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. अभिषेक घोसाळकर आताच माझ्यासोबत मातोश्रीवर बैठक करून गेल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आता बातमी आली त्याच्यावर गोळीबार झाला, काय चाललंय? गुंडांचं सरकार बसल आहे. आमदाराने गोळी घातली, ती पण पोलीस स्टेशनमध्ये. दोन्ही बाजूने गुंडागर्दी चालू आहे, हे सरकार उलथून लावावं लागेल. मिंधेला बदनाम करायची गरज नाही ते बदनामचं आहे, महाराष्ट्र बदनाम होत असल्याचे ते म्हणाले. अमुक तमुक गुंडाची भेट हे घेत आहेत. गुंड मंत्रालयात रिल्स करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या