एक्स्प्लोर
Advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिकांच्या सभेत गोळीबार
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या चेंबूरमधील सभेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. हा हल्ला राष्ट्रवादीचेच माजी खासदार संजय दिना पाटील आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी केल्याचा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
दरम्यान, एबीपी माझानं नवाब मलिक यांची फोनवरुन प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्याच पक्षाच्या माजी खासदारावर गंभीर आरोप केले आहेत.
'राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार संजय पाटील यांच्या हातात दोन-दोन बंदुका होत्या'
'चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक 139 मध्ये देवनार पोलीस स्टेशनच्या समोरील एका हॉलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा सुरु होता. सभा सुरु असतानाच माजी खासदार संजय दिना पाटील आणि त्यांचे सात ते आठ बंदूकधारी आणि तलवारधारी लोकं सभेत घुसले आणि त्यांनी आमच्या लोकांवर हल्ला सुरु केला. स्वत: संजय पाटील यांच्या हातात दोन दोन बंदुका होत्या. या सर्व प्रकार सुरु असताना तिथं पोलीसही उपस्थित होते.' असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
'माझ्यावरही गोळीबार केला, पण सुदैवानं कुणाला गोळी लागली नाही'
'दरम्यान, माझ्यावर गोळीबार करण्यात आला. पण सुदैवानं मला किंवा इतर कोणत्याही कार्यकर्त्याला गोळी लागली नाही. पण त्यांच्या तलवारधारी लोकांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये आमचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. पण त्यांच्यातील एका बंदूकधारी आणि तलवारीधारी व्यक्तीला आमच्या कार्यकर्त्यांनी पकडलं आहे. दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये आणलं आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्राथमिक प्रक्रिया सुरु आहे.' असं मलिक म्हणाले.
'संजय पाटलांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी'
'संजय पाटील हे राष्ट्रवादी पक्षात असले तरीही सध्या त्यांनी सर्व पक्षांशी संधान बांधलं आहे. त्यामुळे पक्षानं त्यांची हकालपट्टी करावी अशी मी मागणी करतो. कारण की, राष्ट्रवादी पक्ष हा काही गुंडाचा पक्ष नाही. जर पाटलांवर कारवाई झाली नाही तर कार्यकर्ते ते अजिबात सहन करणार नाही.' अशीही मागणी नवाब मलिकांनी केली आहे.
दरम्यान, अणुशक्तीनगरमधील एका राजकीय प्रकरणातून संजय पाटील आणि नवाब मलिक यांच्यामध्ये वाद असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. याच प्रकरणातून हा हल्ला झाल्याचं बोललं जातं आहे.
दरम्यान याप्रकरणी एबीपी माझा बोलाताना खासदार संजय दिना पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहे. 'या सभेत कोणताही गोळीबार झालेला नाही. नवाब मलिक यांच्याच माणसांनी माझ्यावर तलवार आणि चॉपरनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला.' असा आरोप संजय पाटील यांनी केला आहे.
'या तर चोरांच्या उलट्या बोंबा'
'चेंबूरमधील या कार्यक्रमाचं मलाही निमंत्रण होतं. मी त्या कार्यक्रमाला गेलो असता माझ्यावरच तलवार आणि चॉपरनं हल्ला करण्यात आला. पण या कार्यक्रमात कोणताही गोळीबार झालेला नाही. माझ्या बरोबर असणारे पोलीस आणि तिथे उपस्थित असणारे पोलीस हे देखील याबाबत माहिती देऊ शकतील. नवाब मलिक यांच्या लोकांनीच माझ्यावर तलावरीनं हल्ला केला. हल्ला करणारे हे स्थानिक नव्हते. ते त्यांनी कुर्ला आणि इतर परिसरातून आणलेले गुंड होते.' असा आरोप संजय दिना पाटील यांनी नवाब मलिकांवर केला आहे.
'मी हल्ला केला असं म्हणणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. जर माझ्यावर तलवार आणि चॉपरनं हल्ला केला. माझ्याकडेही परवानाधारक बंदूक आहे. पण तिथं कोणत्याही प्रकारचा गोळीबार झाला नाही.' असंही पाटील म्हणाले.
'ज्या वॉर्डचा मेळावा होता. तेथील वॉर्ड अध्यक्षाच्या निवडीला सचिन आहिर यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे असा काही प्रकार होणार अशी मला शंका होती. हा माझ्याविरुद्ध सर्व पूर्वनियोजत कट होता. दरम्यान या प्रकरणी मी पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माझी तक्रार नोंदवणार आहे.' अशी माहिती पाटलांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
या संपूर्ण प्रकरणाबाबत राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन आहिर यांनी एबीपी माझाशी फोनवरुन बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दोन्ही नेत्यांना जाब विचारण्यात येईल, पक्ष दोषींवर नक्कीच कारवाई करेल: सचिन आहिर
'हा संपूर्ण प्रकार निषेधार्ह आहे. पक्षाच्या पातळीवर याची दखल घेण्यात आली असून दोनही नेत्यांना उद्या बोलावलं आहे. या दोन्ही नेत्यांचं म्हणणं ऐकून घेऊ आणि यातून जर काय झालं नाही तर दोषींवर पक्ष नक्कीच कारवाई करेल.' असं आहिर म्हणाले.
हा वाद या थरापर्यंत नेण्याची काहीही गरज नव्हती. पण या प्रकरणाची पोलीस नक्कीच संपूर्ण चौकशी करतील. हा कार्यकर्त्यांचा अंतर्गत मेळावा होता त्यामुळे या दोन्ही नेत्यांना नक्कीच जाब विचारण्यात येईल. यासंबंधी माझं वरिष्ठांशी माझं बोलणं झालं आहे. घडलेला हा संपूर्ण प्रकार पक्ष श्रेष्ठींसमोर मी मांडणार आहे. श्रेष्ठींनी यासंबंधी काय तो निर्णय घ्यायचा आहे. मुंबई अध्यक्ष म्हणून मी या प्रकरणाबाबत सगळी माहिती त्यांना कळवणार आहे.' अशी माहिती आहिर यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement