(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Fire in Mumbai LIC Office : मुंबई विलेपार्लेतील LIC ऑफिसला भीषण आग; आजूबाजूच्या परिसरात धुराचं साम्राज्य
Fire in Mumbai LIC Office : मुंबई विलेपार्लेतील LIC ऑफिसला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Fire in Mumbai LIC Office : मुंबईतील सांताक्रूझ परिसरात असलेल्या एलआयसी कार्यालयात भीषण आग लागली आहे. LIC ऑफिसच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सकाळी सात वाजताच्या सुमारास ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली होती. परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला आगीसंदर्भात माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, LIC ऑफिस असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली असून पगार बचत योजना विभागात आग लागली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, आगीत विजेच्या तारा, संगणक, फाइल रेकॉर्ड, फर्निचर जळून खाक झालं आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीत अद्याप कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती आहे.
त्याचवेळी एलआयसीच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, शनिवारी सकाळी विलेपार्ले पश्चिम येथील एसव्ही रोडवर असलेल्या इमारतीत आग लागली. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागल्याची माहिती तातडीनं अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकानं परिसरातील लोकांना बाहेर काढले. यानंतर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. अद्याप आग विझली नसून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान, आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच, आगीमुळे अनेक एलआयसी पॉलिसी होल्डर्स (ग्राहक) च्या कागदपत्रही जळून खाक झाल्याची शक्यता आहे.
"आमचे SSS विभागीय कार्यालय असलेल्या LIC च्या जीवन सेवा इमारतीत, सांताक्रूझ(W) मध्ये सकाळी 6.40 च्या सुमारास आग लागली. ती इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत मर्यादित होती. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहे. कर्मचार्यांना प्रभावित करणारी कोणतीही जीवितहानी किंवा समस्या नाहीत. जवळच असलेले कॉर्पोरेशनचे डेटा सेंटर सुरक्षित आहे आणि आमच्या IT मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी खबरदारीचे उपाय केले गेले आहेत. ग्राहकांना सेवा देण्यासाठी आमच्या सर्व महत्त्वाच्या IT मालमत्तेमध्ये पुरेशी आपत्ती पुनर्प्राप्ती व्यवस्था आहे. त्यामुळे ग्राहकांना सेवा देण्यात कोणतीही अडचण येणार नाही.", असं एलआयसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :