दुष्काळी भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फी माफ, सरकारचा निर्णय
प्रतिपूर्तीच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करुन थेट विद्यार्थी अथवा पालकांच्या खात्यात फीची प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे. दुष्काळी भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्याना परीक्षा फी माफीची ही सवलत शासकीय, अनुदानित माध्यमिक शाळा, कनिष्ट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लागू असणार आहे.
मुंबई : दुष्काळी भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्कासह संपूर्ण फी माफ होणार आहे. ही फी RTGS मार्फत थेट विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, असा निर्णय शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी घेतला आहे.
याआधी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीची प्रतिपूर्ती करताना फक्त परीक्षा फी माफ केली जात होती. मात्र प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्क मात्र आकारले जात होते. आता हे शुल्क देखील माफ करण्यात आलं आहे.
यापूर्वी दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शाळा प्रस्ताव तयार करुन शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवत असे. त्यानंतर शिक्षण अधिकारी आणि शिक्षण विभाग त्याला मंजुरी देऊन शाळेला हा निधी उपलब्ध करुन दिला जात होता. मग फी विद्यार्थ्यांना परत मिळत असे. यामध्ये अनेक वेळा उशीर होत असल्याचं दिसून आलं होतं.
त्यामुळे आता प्रतिपूर्तीच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करुन थेट विद्यार्थी अथवा पालकांच्या बँक खात्यात फीची प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे. दुष्काळी भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीची ही सवलत शासकीय, अनुदानित माध्यमिक शाळा, कनिष्ट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लागू असणार आहे.