एक्स्प्लोर
सावधान! मुंबईत तोतया क्लिनअप मार्शल फिरत आहेत
सध्या मुंबईत काही तोतया क्लिनअप मार्शल फिरत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. हे तोतया क्लिनअप मार्शल नियमांचा धाक दाखवून पैसे उकळत आहेत.

मुंबई : सध्या मुंबईत काही तोतया क्लिनअप मार्शल फिरत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. हे तोतया क्लिनअप मार्शल नियमांचा धाक दाखवून पैसे उकळत आहेत. मुंबई शहर स्वच्छ रहावं, यासाठी मुंबई महापालिकेने क्लिनअप मार्शल ठिकठिकाणी नियुक्त केले. हे क्लिनअप मार्शल रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, कचरा टाकणाऱ्या, अस्वच्छता पसरवणाऱ्या व्यक्तिंवर कारवाई करु शकतात. अशा व्यक्तिंवर नियमानुसार दंडआकारणी होऊ शकते. परंतु काहीजण खोटे क्लिनअप मार्शल बनून याचा फायदा घेत आहेत आणि मुंबईकरांना लुबाडत आहेत. घाटकोपर विक्रोळी पार्कसाईट या भागांतील 'एन' विभागात 'क्लिनअप मार्शल' जास्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. 'एन' विभाग कार्यालयाने सदर तक्रारीच्या अनुषंगाने चिराग नगर पोलीस ठाण्यामध्ये तोतया मार्शलबाबत एफआयआरही दाखल केला आहे. तसेच घाटकोपर रेल्वे स्थानक पूर्व, पश्चिम आणि इतर उपद्रव होत असलेल्या ठिकाणी 'क्लिनअप मार्शल'मार्फत करण्यात येणाऱ्या कारवाई व दंडात्मक रकमेचा फलक लावण्यात आला आहे. महापालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, फलकावर दर्शविण्यात आलेल्या रकमेपेक्षा जास्त दंडात्मक रक्कम 'क्लिनअप मार्शल'ला, कोणत्याही अधिकारी किंवा संस्थेला (Agency) देऊ नये. तसेच सदर रक्कम देण्यापूर्वी सदर ठिकाणच्या कामगाराचे ओळखपत्र व गणवेश तपासावा. ओळखपत्र आणि गणवेश नसल्यास संबंधित नागरिकांनी स्थानिक पोलिस/विभाग कार्यालयात संपर्क साधावा, असेही पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
करमणूक
निवडणूक























