Mumbai Crime : गुंतवणूकदारांना 2.77 कोटींचा गंडा, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून स्टॉक ब्रोकरला बेड्या
Mumbai Crime : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कन्कन्समार्ट शेअर्स आणि स्टॉक ब्रोकर प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकाला 52 गुंतवणूकदाराची 2.77 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे.
Mumbai Crime : कॉन्कन्समार्ट शेअर्स अॅण्ड स्टॉक ब्रोकर प्रायव्हेट लिमिटेडच्या (Concunsmart Shares and Stock Broker Pvt Ldt) संचालकाला अटक करण्यात आली आहे. उच्च परतावा देण्याचं आमिष दाखवून 52 गुंतवणूकदारांची (Investors) 2.77 कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) ही कारवाई केली. प्रशांत आंगणे असं आरोपीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "माहिम, डोंबिवली आणि भांडुपमध्ये कॉन्कन्समार्टची कार्यालये होती. आरोपीने या परिसरातील गुंतवणूकदारांना फसवण्याचा संशय पोलिसांना आहे.
30 ते 70 टक्के परतावा देण्याचं आश्वासन
काही जणांनी एक लाख रुपयांची गुंतवणूक करुन दहा वर्षात एक कोटी रुपये कमावल्याचा दावा कंपनीने जाहिरातीमधून केला होता. सोबतच दहा हजार जणांना पॅम्पलेट वितरीत केले होते, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. तसंच या कंपनीने गुंतवणुकीवर 30 ते 70 टक्के परतावा देण्याचं आश्वासन दिलं होतं.
यू ट्यूबवर देखील भाषणं अपलोड
इतकंच नाही तर गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपी भाषणं देत असत." अलिकडे त्यांनी अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांचं भाषण यू ट्यूबवर देखील अपलोड करण्यास सुरुवात केली होती, असं पोलीस तपासात समोर आलं आहे.
दुसऱ्या संचालकाच्या भूमिकेची पडताळणी
यासोबतच या कंपनीची दुसरी संचालक पल्लवी आंगणे हिच्या भूमिकेची पडताळणी केली जात आहे, असं पोलिसांनी सांगितलं. एप्रिल 2022 मध्ये नियामक तरतुदींचे पालन न केल्याबद्दल नॅशनल स्टॉक एक्सचेंजद्वारे (NSE) या फर्मची हकालपट्टी करण्यात आली होती.
फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता
दरम्यान सध्या 52 गुंतवणूकदारांनी पोलिसांशी संपर्क साधला असला तरी फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. विविध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल झाल्यामुळे आम्ही आमच्याकडे गुन्हा दाखल केला आहे. आम्ही गुंतवणूकदारांना आवाहन करत आहोत की, त्यांनी पुढे येऊन आरोपींविरुद्ध तक्रारी दाखल कराव्यात. आम्हाला खात्री आहे की रक्कम वाढेल, कारण 2,000 हून अधिक लोकांनी त्यांच्याकडे पैसे गुंतवले आहेत," असं पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितलं.
'ओल्ड इज गोल्ड' योजना
अशोक कांबळे (वय 65 वर्षे) हे या प्रकरणातील प्रमुख तक्रारदार असून त्यांनी प्रथम भांडुप पोलिसांशी संपर्क साधला. कांबळे म्हणाले की, दहिजे नावाच्या एका मित्राने मला कॉन्कन्समार्टमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केलं कारण ही फर्म दरवर्षी 70 टक्के परतावा देते. दिहाजे यांनी कांबळे या कंपनीच्या 'ओल्ड इज गोल्ड' या योजनेबाबत संचालकांच्या यूट्यूबवरील काही लिंक्स दाखवल्या. त्यानंतर कांबळे यांनी फर्मच्या कार्यालयाला भेट दिली आणि इतर काही लोकांसह एका सेमिनारमध्ये भाग घेतला. यात आरोपी प्रशांत आंगणेने दावा केली की, त्यांना शेअर बाजारातील ट्रेडिंगचा चांगला अनुभव आहे. त्याने कोट्यवधी रुपये कमावल्याचा आणि आपल्या गुंतवणूकदारांना चांगला नफा दिला. सोबतच सेमिनारमध्ये सात योजनांबद्दल माहिती दिली. यानंतर कांबळे यांनी जून 2021 मध्ये त्यापैकी एका योजनेत 3.5 लाख रुपये गुंतवले आणि त्यांना 35 टक्के नफा देण्याचं आश्वासन देण्यात आलं. परंतु कंपनी अडचणीत असल्याचं सांगत कांबळे यांना कोणतेही रिटर्न न मिळाले नाही. मग आंगणेने फेब्रुवारी 2022 मध्ये गुंतवणूकदारांची बैठक बोलावली आणि सर्वांना त्याच्यावर विश्वास ठेवण्यास सांगितलं. परंतु त्यानंतरही पैसे न मिळाल्याने अशोक कांबळे यांनी यावर्षी जानेवारी महिन्यात भांडुप पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर आणखी तक्रारी आल्यानंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं.