मुंबईतील रेल्वे स्थानकात आपत्कालीन वैद्यकीय केंद्र रात्री बंद, दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग येणार का?
देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. त्यानुसार मध्य, पश्चिम रेल्वेने वैद्यकीय केंद्र सुरु तर केली, पण ती रात्रीची बंद असल्याचं समोर आलं
मुंबई : रेल्वे स्थानकात सकाळपासून रात्री-अपरात्री अनेक दुर्घटना घडत असतात त्यामुळे रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरु करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने 26 मार्च 2009 रोजी रेल्वेला दिले होते. त्यानंतर रेल्वे बोर्डानेही देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, मध्य आणि पश्चिम रेल्वेने या आदेशाचे पालन करत रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरु केले होते. मात्र मुंबईत स्थानकातील आपत्कालीन वैद्यकीय केंद्र रात्री बंदच असतात तसेच ही केंद्रे वाईट स्थितीत असल्याचं समोर येत आहे.
मुंबईत अनेक स्थानकात भायखळा स्थानकाप्रमणेच अंधेरी, माहिम, दादर, मुंबई सेंट्रल स्थानकात आपत्कालीन वैद्यकीय केंद्रांची परिस्थिती वाईट आहे. विशेष म्हणजे पश्चिम रेल्वेच्या आणि मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकात वैदकीय केंद्र ही सकाळच्या वेळी सुरु असतात, तर रात्री पूर्णपणे बंद असल्याचे दिसतात. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरु केले आहे. मात्र, ही सुविधा प्रवाशांसाठी ठराविक वेळेतच मिळते. त्यामुळे रात्री रेल्वे अपघातातील जखमी आणि रेल्वे प्रवासात अचानक प्रवाशांची प्रकृती खराब झाल्यास त्यांना ही सुविधा मिळत नाही. प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे.
रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय केंद्र हे खासगी हॉस्पिटल आणि औषध निर्माण कंपन्यांमार्फत चालवली जातात. रात्री प्रवासादरम्यान रेल्वे प्रवाशांना आपत्कालीन वैद्यकीय सेवेची गरज भासली तर, स्थानकांवर उपलब्ध नसते ही बाब निदर्शनास आल्यानंतर याबाबत सामाजिक कार्यकर्ते समीर झवेरी यांनी रेल्वेकडे लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीत झवेरी यांनी न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याचे विनंती केली.
या संदर्भात आम्ही रेल्वे प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. माहिती घेऊन बोलू असे जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. मग कोर्टाचे आदेश असताना ही परिस्थिती आहे. त्यामुळे रेल्वेत आपत्कालीन वैद्यकीय केंद्राची ही परिस्थिती कधी बदलणार? दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग येणार का? की कोर्टात याविरुद्ध दाद मागित्यानंतर जाग येणार हा प्रश्न आहे.