Durga Bhosale Death : दुर्गा भोसले गेली आणि सर्वांचं मन सुन्न झालं, ठाकरे गटाच्या युवा सेनेने रणरागिणी गमावली
प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षासाठी खूप महत्वाचा असतो, दुर्गा भोसले हे त्यापैकीच एक नाव आहे. पक्षासाठी तिला खूप काही करायची इच्छा होती पण तिला शरीराने साथ दिली नाही. आदित्य ठाकरेंनी दुर्गाच्या रुपाने एक रणरागिणी गमावली.
Durga Bhosale Death : प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षासाठी खूप महत्वाचा असतो, दुर्गा भोसले शिंदे (Durga Bhosale Shinde) हे त्यापैकीच एक नाव आहे. आपल्या पक्षासाठी दुर्गा राब राब राबली. पक्षासाठी तिला खूप काही करायची इच्छा होती पण तिला शरीराने साथ दिली नाही. अखेर आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) दुर्गाच्या रुपाने एक रणरागिणी गमावली आहे. ठाण्यातल्या जनप्रक्षोभ मोर्च्यात दुर्गा भोसले सहभागी झाली होती एकीकडे उन्हाचा पारा वाढत होता, दुसरीकडे प्रचंड गर्दी होती त्यातही दुर्गा भोसले आदित्य ठाकरेंसाठी जोरजोरात घोषणा देत ठाण्यातल्या रस्त्यावर उतरली होती. आपल्या सोबतच्या तरुणींमघ्ये उत्साह वाढवण्याचं काम दुर्गा नेहमीच चोख करायची. ठाण्यातही दुर्गा आक्रमक बाणा घेऊन घोषणाबाजी करत होती. पण तिला अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण दुर्गाच्या शरीराने मात्र साथ सोडली होती.
नाव दुर्गा भोसले शिंदे... ठाकरे गटात युवा सेना (Yuva Sena) सचिव म्हणून कार्यरत...वय अवघे 30 वर्ष... शिवसेना ठाकरे गटाची ही रणरागिणी मागील आठ वर्षांपासून पक्षात कार्यरत होती. अनेक विषयासंदर्भात आवाज उठवायला ठाकरे गटात आघाडीवर असलेली दुर्गा आपल्यात नाही यावर विश्वास ठेवायलाच ठाण्यातील जनक्षोभ मोर्चात तिच्यासोबत सहभागी झालेले कार्यकर्ते तयार नाहीत.
....अन् दुर्गाचं निधन झालं
रोशनी शिंदे हल्ल्याच्या विरोधात ठाण्यातला छत्रपती शिवाजी महाराज मैदानातून भर उन्हात दुपारी तीन वाजता महाविकास आघाडीचा मोर्चा निघाला. डोक्यावर ऊन, मोठी गर्दी आणि त्यात घोषणाबाजी देत दुर्गा या मोर्चात सहभागी झाली आणि आपल्याच सहकाऱ्यावर झालेल्या मारहाणीच्या विरोधात घोषणा देत आदित्य ठाकरेंसोबत आणि आपल्या इतर महिला कार्यकर्त्यांसोबत मोर्चात पुढे निघाली. मोर्चानंतर जेव्हा अस्वस्थ वाटायला लागलं तेव्हा ठाण्यातून आपल्या मुंबईत घरी आली आणि बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेताना हृदयविकाराचा झटका येऊन दुर्गाचं निधन झालं.
युवा सेनेचा आवाज
दुर्गा हा दक्षिण मुंबईतला युवा सेनेचा आवाज होती, आदित्य ठाकरेंच्या 'प्रथम ती' या संकल्पनेच्या माध्यामातून युवा सेनेतलं पहिलं सचिव पद एक महिला म्हणून दुर्गा भोसलेला देण्यात आलं होतं. शाळा, कॅालेज आणि तरुणाईचे प्रश्न घेऊन दुर्गा युवासेनेसाठी नेहमीच ढाल बनून राहायची. युवा सेनेच्या कॅम्पेनमध्ये देखील तिचा नेहमीच पुढाकार राहिला आहे.
- दुर्गा भोसलेचे वडील तसे मूळचे काँग्रेसचे
- पण मुंबईतली परिस्थिती पाहता दुर्गा भोसले युवा सेनेत आली
- २०१७ मध्ये आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दुर्गा भोसले शिवसेनेत
- त्यानंतर लगेच 2017 मध्ये झालेले महानगरपालिकेच्या निवडणुकीत दुर्गा मलबार हिलमघून निवडणुक लढली होती
- पण मलबार हिल परिसरात शिवसेनेची फारशी ताकद नसल्याने तिला पराभव स्वीकारावा लागला होता
- त्यानंतर 23 जानेवारी 2018 झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत दुर्गा भोसलेला सचिव पद जाहीर करण्यात आलं
- विविध आंदोलनं, विविध उपक्रमांच्या माध्यमातून दुर्गा भोसले नेहमीच आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून उभ्या असायच्या
- लग्नानंतरही दुर्गा भोसले यांनी राजकीय कारकीर्द सोडली नाही
- तिने आपलं राजकारण आणि समाजकारण सुरुच ठेवलं
राज्याच्या राजकारणात युवा चेहाऱ्यांच्या साथीने नेते पुढे चालत असतात त्यापैकी एकच दुर्गा भोसले शिंदे हे नाव होतं. आदित्य ठाकरेंच्या प्रत्येक काळात दुर्गा पक्षासाठी एकाच जागी पाय रोवून उभी राहिली. पक्षात बंडं झालं, अनेकांनी आदित्य ठाकरेंची साथ सोडली, पण दुर्गा खंबीरपणे पक्षासोबतच राहिली पण आज तिच नसल्याने पक्षाची मोठी हानी झाली आहे.
दुर्गाच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का
खरंतर जी दुर्गा आपल्या सहकाऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पक्षाच्या आदेशानुसार भर उन्हात घोषणा देत मोर्चात निघाली तीच दुर्गा या मोर्चानंतर आपल्यातून निघून जाईल हे कुणाला असं वाटलं नव्हतं. त्यामुळे एकीकडे राजकारणाची लढाई युद्धपातळीवर सुरु असताना आपली युवा सेना कार्यकर्ती आपल्यातून निघून गेल्याचं दुःख ठाकरे गटाला झालं आहे.