Cyclone Tauktae : मुंबईला ऑरेंज अलर्ट; लसीकरण रद्द, तर लोकल सेवाही विस्कळीत
Cyclone Tauktae : तोक्ते चक्रिवादळानं रविवारी कोकण किनारपट्टीवर चांगलाच धुमाकूळ घातला. यामागोमाग आता मुंबईतही त्याचे थेट परिणाम दिसून येत आहेत.हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबई सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या वतीनं अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
Cyclone Tauktae : हवामान विभागानं मुंबई तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबई सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या वतीनं अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. तसेच चक्रीवादळामुळेशहरातील लसीकरणही रद्द करण्यात आलं आहे.
बीएमसीच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, सोमवारी म्हणजेच, आज चक्रीवादळाचा परिणाम मुंबईवर दिसून येणार आहे. त्यामुळे आज लसीकरणाची प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. बीएमसीनं हवामान विभागाने दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर हा निर्णय घेतला. बीएमसीनं यासंदर्भात ट्वीट केलं होतं.
तोक्ते चक्रीवादळाचा फटका रेल्वे वाहतुकीला
चक्रीवादळाचा फटका मध्य रेल्वेलाही बसल्याचं पाहायला मिळत आहे. घाटकोपर-विक्रोळी दरम्यान ओव्हरहेड वायर वरती झाडाची फांदी तुटून पडल्यानंतर स्लो ट्रॅकवरील वाहतूक ठप्प झाली आहे. जवळपास एक तासाहून अधिक वेळ प्रवासी ट्रेनमध्ये अडकलेत. ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या स्लो ट्रॅकवरील सर्व वाहतूक फास्ट ट्रॅक वरती वळविण्यात आली आहे. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
मुंबई विमानतळ तीन तासांसाठी बंद
तोक्ते चक्रीवादळ मुंबईच्या दिशने वाटचाल करत आहे. मुंबईत सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सोसाट्याचा वाराही सुटला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळ तीन तासांसाठी म्हणजेच, 11 वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच हवामान विभागानं मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
NDRF ची टीम शिवाजी पार्क आणि दादरमध्ये दाखल
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वेगवेगळ्या चौपाट्यांवर NDRF च्या टीम बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईच्या दादर परिसरात मोठ्या प्रमाणात झाडं कोसळल्यामुळे मदतीसाठी एनडीआरएफ टीम दादर चौपाटी आणि शिवाजी पार्कला पोहोचलेली आहे.
वांद्रे-वरळी सी लिंक पुढील आदेशापर्यंत वाहतुकीसाठी बंद
वांद्रे-वरळी सी लिंक पुढील आदेशापर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. या दरम्यान पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. गरजेच्या आणि अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, असं आवाहन महापालिकेने केलं आहे.
580 रुग्णांचं कोविड-19 केयर सेंटरमधून स्थलांतर
तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून दहिसर, बीकेसी, मुलूंड जंबो कोविड सेंटर मिळून एकूण 580 रुग्णांचे रात्रीच स्थलांतर करण्यात आलं आहे. कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर चक्रीवादळात झालं असून अतिशय रौद्र रुप धारण करत हे वादळ आता मुंबईनजीक येऊन पेहोचलं आहे. तोक्ते चक्रिवादळानं रविवारी कोकण किनारपट्टीवर चांगलाच धुमाकूळ घातला. यामागोमाग आता मुंबईतही त्याचे थेट परिणाम दिसून येत आहेत.
'निसर्ग'पाठोपाठ 'तोक्ते'चं संकट
मागील वर्षी निसर्ग चक्रीवादळाशी दोन हात केल्यावर आता यंदाच्या वर्षी राज्याला तोक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला. या वादळाशी दोन हात करण्यासाठी प्रशासनाकडूनही तयारी करण्यात आली. अरबी समुद्रात तयार झालेलं हे तोक्ते चक्रीवादळ तासागणिक अधिक सक्रिय होणार असून त्याचा वेगही वाढत आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसानं हजेरी लावली.
दक्षिण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या वादळाचे थेट परिणाम केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीच्या भागांत दिसून आले, किंबहुना अद्यापही ही क्षेत्र वादळामुळं प्रभावित आहेत. हे चक्रीवादळ 18 मे पर्यंत गुजरात किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :