Cyclone Tauktae : मुंबईत 'तोक्ते' चक्रीवादळ धडकणार नसलं, तरीही त्याचे थेट परिणाम दिसण्यास सुरुवात
तोक्ते चक्रिवादळानं रविवारी कोकण किनारपट्टीवर चांगलाच धुमाकूळ घातला. यामागोमाग आता मुंबईतही त्याचे थेट परिणाम दिसून येत आहेत.
Cyclone Tauktae : तोक्ते चक्रिवादळानं रविवारी कोकण किनारपट्टीवर चांगलाच धुमाकूळ घातला. यामागोमाग आता मुंबईतही त्याचे थेट परिणाम दिसून येत आहेत. हे चक्रीवादळ मुंबईतील किनारपट्टीला जरी धडकणार नसलं तरी त्याचा प्रभाव मात्र मायानगरीवर जाणवणार आहे. किंबहुना त्यास सुरुवातही झाली आहे.
चक्रीवादळाचा सतर्कतेचा इशारा पाहता या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याचसोबत मच्छिमारांना देखील आवाहन केलं जातं आहे. मुंबईतील खार-दांडा कोळीवाड्यातील १५० मच्छिमारांच्या बोटी समुद्रातून परतल्या आहेत. चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे कोळीवाड्यातील लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेकडून कोळीवाड्यातील नागरिकांची राहण्याची व्यवस्था सुरक्षित स्थळी करण्यात आली आहे. युवासेनेच्या राहुल कनल यांच्याकडून तिथे औषधं आणि खाण्यापिण्याची सोय करण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय झाल्यास करण्यात युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
इथं मुंबई आणि नवी मुंबई परिसरात पावसाला सुरुवात झाली असून, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. पण वारा मात्र कायम आहे. शिवाय पावसाची रिमझिम सुरुच आहे. जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी विद्युतपुरवठा खंडीत झाल्यामुळं बहुतांश जिल्हा अंधारात आहे. तर ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची देखील समस्या निर्माण झाली आहे.
रायगडलाही अलर्ट
तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी राहणाऱ्या आतापर्यंत 5 हजार 942 नागरिकांचे स्थलांतरण पूर्ण करण्यात आले. तालुकानिहाय स्थलांतरित लोकांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. अलिबाग-339, पेण-158, मुरुड-1067, पनवेल-168, उरण-451, कर्जत-0, खालापूर-176, माणगाव-490, रोहा- 72, सुधागड-165, तळा- 135, महाड-1080, पोलादपूर-86, म्हसळा- 397, श्रीवर्धन- 1158. या एकूण 5 हजार 942 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
'निसर्ग'पाठोपाठ 'तोक्ते'चं संकट
मागील वर्षी निसर्ग चक्रीवादळाशी दोन हात केल्यावर आता यंदाच्या वर्षी राज्याला तोक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला. या वादळाशी दोन हात करण्यासाठी प्रशासनाकडूनही तयारी करण्यात आली. अरबी समुद्रात तयार झालेलं हे तोक्ते चक्रीवादळ तासागणिक अधिक सक्रिय होणार असून त्याचा वेगही वाढत आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसानं हजेरी लावली.
दक्षिण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या वादळाचे थेट परिणाम केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीच्या भागांत दिसून आले, किंबहुना अद्यापही ही क्षेत्र वादळामुळं प्रभावित आहेत. हे चक्रीवादळ 18 मे पर्यंत गुजरात किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे.