(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मैदानातील कामासाठी निविदा, तीन वर्षांसाठी तीन कोटींचं कंत्राट; शिवाजी पार्कात भ्रष्टाचार?
मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये भ्रष्टाचार होतोय का असा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे या मैदानात पाणी मारणे, गवत उगवणे आणि इतर कामांसाठी तीन वर्षासाठी तीन कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आले आहे.
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे नेहमीच अनेक कारणाने चर्चेत असते. या ठिकाणी अनेक ऐतिहासिक गोष्टी आहेत. तसेच राजकीय घडामोडींसाठी हे मैदान प्रसिद्ध आहे. त्यात आता या मैदानात भ्रष्टाचार होतोय का म्हणून हे मैदान चर्चेत आहे. या मैदानात पाणी मारणे, गवत उगवणे आणि इतर कामांसाठी तीन वर्षासाठी तीन कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र यावर सामान्य नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप करत आक्षेप घेतला आहे.
शिवाजी पार्क मैदानात अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच मैदानाच्या कामासाठी त्रैवार्षिक निविदा काढण्यात आलेली आहे. यामध्ये 365 दिवस मैदानात पाणी मारणे, गवत उगवणे आणि इतर कामे केली जाणार आहेत. त्यासाठी तीन कोटी रुपयांची निविदा देण्यात आलेली आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत यामध्ये भ्रष्टाचार होत आहे, असा आरोप केला आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बेलवडे यांनी म्हटले आहे की, "365 दिवसांपैकी 45 दिवस हे मैदान न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कार्यक्रमासाठी राखीव असणार आहेत. त्यावेळी देखील निविदेत दिलेली काम करता येणार नाही. तसेच पावसाळ्यात साडेतीन महिन्यापेक्षा अधिक दिवस देखील कामे नसतात. त्यामुळे 365 दिवसांपैकी 197 दिवसांपेक्षा अधिक दिवस पाणी मारायचे किंवा काही काम नसेल. मग 165 दिवसांसाठी तीन वर्षांची निविदा कशासाठी असा सवाल प्रकाश बेलवडे यांनी उपस्थित केला.
शिवसेना आणि महापालिकेने भ्रष्टाचार करण्याचे ठरवले आहे. दादर शिवाजी पार्क मैदान 1997 ला खेळासाठी लोकार्पण झाल्यानंतर प्रथमच शिवाजी पार्क मैदानात पाणी मारणे आणि गवत उगवणे यासाठी महापालिकेने त्रैवार्षिक टेंडर तीन कोटी रुपयांचे काढले आहे. म्हणजे दिवसाला पाणी मारणे आणि गवत काढणे आणि वाढवण्यास 60 हजार रुपये कंत्राटदाराला मिळतील. पावसाळ्यात ओलावा असल्याने आणि कार्यक्रमांच्यावेळी या मैदानात कोणतेही काम नसते. तरीही 365 दिवस 60 हजार खर्च होणार आहे. त्यामुळे कोटी रुपयांचे टेंडर मैदानासाठी की भ्रष्टाचारासाठी? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी एबीपी माझाशी बोलताना उपस्थित केला. जर अशाप्रकारे भ्रष्टाचार होणार असेल तर आम्ही सर्व सामान्य नागरिक आणि या मैदानात खेळायला येणारे अनेकजण गप्प बसणार नाही, जनतेचा पैसा असा कोणाला खाऊ देणार नाही. दिलेले कंत्राट फेरविचार करुन द्यावे, अशी मागणी करत आम्ही एक मोठे जनआंदोलन पुढील काळात करु, असं देखील प्रकाश बेलवडे यांनी म्हटले आहे.
यावर जी नॉर्थच्या महापालिका अधिकारी किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, "दादर शिवाजी पार्क या मैदानात आपण आता गेल्या अनेक वर्षांपासून अनेक विकासाची काम करत आहोत. त्यामुळे या मैदानाची चांगली निगा राखावी यासाठी आपण हे कंत्राट दिले आहे. जेणेकरुन मैदानाची काळजी घेता येईल. यावर कोणीही राजकारण किंवा आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. मैदानाची निगा राखण्यासाठी आणि विकासाच्या दृष्टीने हे काम आपण करत आहोत.