कोणत्याही परिस्थितीत उद्योग सुरुच ठेवणार; मराठी तरुणांचा निर्धार!
कोरोनामुळे संपूर्ण जग थांबलं. त्यामुळे देशभरातील लाखो तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. कोरोना जरी संकट म्हणून आला असला तरी या संकटामध्ये मुंबईतील माझगाव परिसरात राहणाऱ्या अनेक तरुणांनी त्याचं रूपांतर संधीमध्ये केलं आणि त्यांनी छोटे-मोठे ऑनलाईन व्यवसाय सुरु केले.
मुंबई : लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर परप्रांतीय मुंबई सोडून आपल्या मूळ गावी गेले. याचवेळी मुंबईतील मराठी तरुणांनी पुढाकार घेत भाजी, कपडे यापासून मासळी विक्रीपर्यंतचे ऑनलाईन व्यवसाय सुरु केले. मात्र आता लॉकडाऊन शिथिल झाल्याने अनेक परप्रांतिय पुन्हा मुंबईत परतू लागले आहेत. त्यामुळे भाजी आणि मासळी विक्री करणार्या मराठी तरुणांसमोर पुन्हा एकदा परप्रांतीयांचे आव्हान उभे राहिले आहे. परंतु आता मिळालेली संधी दवडायची नाही, आम्ही सक्षमपणे व्यवसाय करू शकतो. हे दाखवून देण्याचा निर्धार मराठी तरुणांनी केला आहे.
कोरोनामुळे संपूर्ण जग थांबलं. त्यामुळे देशभरातील लाखो तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. कोरोना जरी संकट म्हणून आला असला तरी या संकटामध्ये मुंबईतील माझगाव परिसरात राहणाऱ्या कपिल पाटीलसह अनेक तरुणांनी त्याचं रूपांतर संधीमध्ये केलं आणि त्यांनी सुरु केले छोटे-मोठे ऑनलाईन व्यवसाय. हे तरुण मुंबई आणि उपनगरांमध्ये ऑनलाईन ऑर्डर घेऊन ताज्या माशांची विक्री करत आहेत. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर नागरिकांना घरातून बाहेर पडणे शक्य नव्हते. त्यातच मुंबईतील परप्रांतीय हे आपल्या गावी गेल्यामुळे मुंबईकरांना भाजी, मासळी मिळणे अवघड झाले होत. अशा परिस्थितीमध्ये मुंबईतील अनेक मराठी तरुणांनी रस्त्यावर उतरून भाजी आणि मासळी विक्री करण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी ऑनलाईन विक्री सुरु केली. ताजी आणि स्वस्त: मासळी तरुण ऑनलाईनच्या माध्यमातून घराघरांमध्ये पोहचवू लागले. नागरिकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला.
सध्या लॉकडाऊन शिथिल झाले आहे. त्यामुळे आता मुंबई सोडून गेलेले परप्रांतीय पुन्हा मुंबईत दाखल होत आहेत. आणि ते पुन्हा या छोट्या-मोठ्या व्यवसायांवर अतिक्रमण ही करत आहेत. डोक्यावर माशांची घमेलं घेऊन दारोदारी फिरणार्या या परप्रांतीयांमुळे पुन्हा मराठी तरुणांनी सुरु केलेले उद्योग अडचणीत येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. व्यवसायामध्ये मराठी तरुणांसमोर परप्रांतीयांचे आव्हान उभे राहण्यास सुरुवात झाली आहे. या आव्हानाला समर्थपणे सामोरे जाण्याचा निर्णय मराठी तरुणांनी घेतला आहे.
लॉकडाऊनमुळे नोकऱ्या गेल्या खऱ्या, पण पुन्हा नोकरी करायची नाही. नव्याने सुरु केलेला उद्योग सुरूच ठेवायचा असा निर्धार मुंबईतील मराठी तरुणांनी केलेला आहे. अनेक राजकीय पक्षांनी मुंबईतील नोकरी गेलेल्या तरुणांना पुन्हा नोकरी देऊ अशी आश्वासने दिली होती. मात्र ती प्रत्यक्षात अजूनही उतरलेली नाहीत. पण मुंबईतील तरुणांनी या पोकळ आश्वासनांची वाट न बघता आपण रहात असलेल्या ठिकाणी कोणते उद्योग सुरु करता येतील याचा आढावा घेऊन त्यांनी नवनवीन उद्योग सुरु केलेले आहेत. हे व्यवसाय पुन्हा सुरु ठेवण्यासाठी त्यांना आता प्रशासनाने ही तितकीच मदत करणं गरजेचे आहे. तरच नव्याने उभारी घेतलेला मुंबईतील तरुण या उद्योगांमध्ये यशस्वी होईल.
"लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही ऑनलाईन मासळी विक्री करण्यासा सुरुवात केली. त्यावेळी आम्हाला दिवसाला 10 ते 15 ऑर्डर येत होत्या. पण लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर परप्रांतीय डोक्यावर पाटी घेऊन घरोघरी जाऊ लागल्याने आमच्या ऑर्डर दोन ते तीनवर आल्या आहेत. आम्ही समुद्रातून आलेली ताजी मासळी ग्राहकांना देतो, तर परप्रांतीयांकडून दोन ते तीन दिवस बर्फामध्ये ठेवलेली मासळी विकली जाते. त्यामुळे तिचा भाव कमी असल्याने आम्हाला फटका बसू लागला आहे. मराठी तरुण उद्योग करू शकत नाही हा समज दूर करण्यासाठी आम्ही लॉकडाऊनमध्ये सुरु केलेला ऑनलाईन व्यवसाय कायम ठेवण्यासाठी नवी पद्धतींचा वापर करणार आहोत. व्यवसायाच्या पद्धतीत बदल करून या आव्हानाचा आम्ही सामना करू" , अशी प्रतिक्रिया माझगाव येथे राहणाऱ्या कपिल पाटील या मराठी तरुणाने दिली आहे.