(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाविद्यालयीन शिक्षकांचं मुंबईत आंदोलन, आंदोलनामुळे बारावीच्या निकालासाठी उशीर होण्याची चिन्ह
आंदोलनाला बसलेले शिक्षक हे महाराष्ट्र राज्य अनुदानित कनिष्ठ महाविदयालयीन वाढीव पद शिक्षक कृती समितीचे सदस्य आहेत. या शिक्षकांची शंभर टक्के अनुदानित शाळेतील वाढीव पदांची मान्यता देण्यात यावी अशी मागणी आहे.
मुंबई : राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्याच्या निकालाला उशीर होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. कारण राज्यातील विविध महाविदयालयातील वाढीव पदावरील शिक्षक मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी बसले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील 1293 शिक्षकांकडे प्रत्येकी 200 उत्तर पत्रिका तपासण्यासाठी आल्या आहेत. त्यामुळे आता जवळपास 2 लाख 40 हजार विद्यार्थ्याच्या प्रश्नपत्रिका तपासण्यावाचून पडून राहिल्या आहेत. जोपर्यंत आमची मागणी मान्य होतं नाही तोपर्यंत आम्ही पेपर तपासणार नसल्याचा पवित्रा या शिक्षकांनी घेतला आहे. शिवाय बारावीच्या विद्यार्थ्याच्या निकालाला उशीर झाल्यास याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल असं आंदोलकांनी म्हंटल आहे.
आंदोलनाला बसलेले शिक्षक हे महाराष्ट्र राज्य अनुदानित कनिष्ठ महाविदयालयीन वाढीव पद शिक्षक कृती समितीचे सदस्य आहेत. या शिक्षकांची शंभर टक्के अनुदानित शाळेतील वाढीव पदांची मान्यता देण्यात यावी अशी मागणी आहे. या शिक्षकांचा प्रश्न मागील सोळा वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत बोलताना शिक्षकांनी माहिती दिली की, मागील सरकारने केवळ आम्हांला आश्वासनं दिली. ज्या ज्यावेळी आम्ही आंदोलनं केली त्या त्या वेळी केवळ आमच्याकडून माहिती मागवण्यात आली. आशा प्रकारे मागील पाच वर्षात जवळपास आम्ही 10 वेळा आमची संपूर्ण माहिती प्रशासनाला दिली आहे. त्या फाईल अजूनही मंत्रालयात पडून आहेत. परंतू आमच्या प्रश्नाकडे या सरकारने लक्ष दिलं नाही. आमच्या सोबतचे काही शिक्षक असे देखील आहेत. ज्यांनी आयुष्यभर सेवा करून देखील त्यांना पगार मिळाला नाही. काही शिक्षकांची तर निवृत्त होण्याची वेळ आली तरीदेखील त्यांना अद्याप अपेक्षित पगारी मिळत नाही. त्यामुळे आम्ही सर्व बांधवांनी मिळून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
या शिक्षकांनी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होतं नाहीत तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. आंदोलनात महिला शिक्षक आपल्या लहान मुलांना घेऊन बसल्या आहेत. यातील अनेकांची मुंबईत राहण्याची देखील सोय नाही तरी देखील ते आंदोलनावर ठाम आहेत.